Sunday, April 15, 2018

गाड्या का पेटतात?


गाड्यांना आगी लागण्यामागे 
तांत्रिक बाबींसोबत
अज्ञान, निष्काळजीपणा हीदेखील कारणे

चालत्या गाड्या पेटल्याच्या काही घटना गेल्या आठवड्यात घडल्या. एकीकडे मोटारगाडीतील तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत असताना दुसरीकडे रस्त्याने जाणारी वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडावी असे का घडते याचा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. प्रथमदर्शनी पाहता या दुर्घटनांच्या मुळाशी तांत्रिक कारणे आहेत असे दिसते. बारकाईने पाहिल्यास ड्रायव्हिंगमधले दोष, निष्काळजीपणा आणि वाहनाविषयीचे अज्ञान ही कारणेही पुढे येतात.
चालती मोटारगाडी एकाएकी पेटण्याचे कारण इंधनाची गळती, विद्युतवाहक तारा एकमेकीवर घासून ठिणग्या पडणे, इंजिन मर्यादेपेक्षा जास्त गरम होणे इत्यादी गोष्टीत सापडते. ही सगळी यंत्रणेशी संबंधित कारणे म्हणता येतील. याबरोबरच अतिवेगामुळे टायर गरम होऊन पेट घेणे तसेच ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणे अथवा सिगारेट शिलगावण्यासाठी काडी ओढणे हेदेखील संभाव्य आहे. कधीकधी अपघातात वाहन कशावर तरी आपटून पेट घेऊ शकते.  
आधुनिक मोटारगाड्यांमध्ये नवे तंत्रज्ञान वापरले जाते. अनेक स्वयंचलित उपकरणे बसविलेली असतात. वाहनाचा समतोल बिघडू नये यासाठी इलेक्ट्रोनिक स्टबिलिटी कंट्रोल, ब्रेक लावताना रस्त्यावरील पकड सुटू नये म्हणून एबीएस, पुढच्या गाडीवर आपटू नये यासाठी ब्रेक असिस्ट, तीव्र चढावर मागे येऊ नये म्हणून हिल असिस्ट, अपघातात आपटल्यास प्रवाशांना संरक्षण पुरविणाऱ्या एअर ब्याग इत्यादी. याशिवाय वातानुकूलन (एसी) यंत्रणा असतेच. या सर्व उपकरणांचे कार्य आणि त्यांचे नियंत्रण तसेच त्यांच्या कामाची चालकाला सूचना देण्याच व्यवस्था याकरिता विजेच्या तारांचे मोठे जाळे गाडीत बसविलेले असते. गाडी बरेच दिवस पडून असेल, नीट सफाई केले जात नसेल तर उंदीर तर कुरतडतात. त्या एकमेकीवर अथवा बॉडीवर घासून ठिणगी पडू शकते.
गाडी पेट्रोल अथवा डिझेलवर चालणारी असो किंवा एलपीजी, सीएनजीवर, इंधनवाहक नाल्यांमधून गळती झाल्यास एक लहानशी ठिणगी पूर्ण गाडी पेटवायला पुरेशी आहे. विशेषतः उत्पादकाऐवजी बाहेरून बसवून घेतलेले एलपीजी/सीएनजी किट, मानकाप्रमाणे योग्य दर्जाच्या नसलेल्या नळ्या आणि जोडण्या, गाडीत छोटा अग्निशामक (फायर एकस्तीन्ग्विशर) ठेवण्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्याचं उपहास करणे, अर्धवट ज्ञान असणाऱ्या गाडी मालकाने किंवा चालकाने पैसे वाचविण्यासाठी चुकीच्या पद्धतीने केलेली दुरुस्ती या गोष्टी आगीला निमंत्रण देऊ शकतात.
इंजिनभोवतालच्या विद्युत तारा उंदरांनी कुरतडू नये याकरिता मारुती सुझुकी इग्निससारख्या मोटारीमध्ये इंजिनच्या कप्प्याला आतून विशिष्ट रसायनाचा लेप दिला जातो. तरीही गाडीचा तळ कोठे घासला तर नीट तपासणी करून घ्यावी.
इंजिन मर्यादेपेक्षा जास्त गरम होऊ नये म्हणून रेडीएटरमधील पाण्याचा प्रवाह इंजिनभोवती खेळवून तापमान नियंत्रित राखले जाते. या तंत्रात आता खूपच प्रगती झाली आहे. साध्या गाड्यांमध्येही स्वयंचलित कूलिंग पंखा असतो. इंजिनाचे तापमान मर्यादेपुढे जाऊ लागताच तो सुरु होतो आणि तापमान स्थिर ठेवतो. परंतु वरीलप्रमाणे उंदरांनी तर कुरतडल्यास पंख्याचे नियंत्रण तुटते आणि इंजिन गरम होऊ लागते. वाढणारे तापमान चालकाच्या लक्षात आले नाही तर इंजिन अति गरम होऊन बंद पडते. गाडी पेटूही शकते. तापमानमापाकवर लक्ष ठेवण्याची सवय चालकाला हवी.
हल्ली अतिवेगवान मोटारी आपल्या देशात मिळतात. रस्तेही बहुपदरी वगैरे होत आहेत. चालवणाऱ्याचा काळ भरधाव वेगाकडे वाढत आहे. वेगामुळे टायर गरम होतात. त्यातच आपला देश उष्ण कटिबंधात. ग्लोबल वार्मिंग आहेच, परिणामी गरम झालेल्या टायरना विश्रांती न मिळाल्यास ते पेट घेऊ शकतात. वेगाने गाडी चालविणे आणि सतत व जोराने (कचाकच) ब्रेक मारणे हे व्हील ड्रम गरम करण्यास कारणीभूत ठरते. तेही आगीचे निमित्त ठरू शकते.
एकदा लागलेली आग पसरविण्यास गाडीमधील प्लास्टिक, रेक्झिन, फायबर, ध्वनिरोधक ग्लासवूल यासारखे घटक साह्य करतात. वातानुकूलित गाड्या झटकन आगीच्या विळख्यात सापडतात.

गाडी चालविण्याचे प्रशिक्षण आपल्या देशात फारच जुजबी दिले जाते. गाडीची लहानमोठी दुरुस्ती आणि तिच्या यंत्रणेची रचना याविषयीचे प्रशिक्षण चालविण्यास शिकणाऱ्याला दिलेच जात नाही. एवढेच काय, आधुनिक उपकरणानी परिपूर्ण असलेली मोटार हाताळायलाही बहुतेकजण ‘बघून बघून’च शिकतात. वाहनाची शास्त्रशुद्ध माहिती घेणे, योग्य वेळी चांगल्या जाणकाराकडून देखभाल-दुरुस्ती करून घेणे आणि ती काळजीपूर्वक वापरणे या गोष्टी अनर्थ टाळू शकतील. 


No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...