Sunday, May 26, 2019

टाटा 'इंट्रा ' - नवे छोटे मालवाहू ट्रक

           टाटा 'इंट्रा ' नावाचे दोन छोटे मालवाहू ट्रक 'टाटा मोटर्स 'ने नुकतेच मोटरपेठेत आणले. इंट्रा  व्ही १० आणि व्ही २० आशिया दोघांची नावं असून त्यांना अनुक्रमे ८०० आणि १४०० सीसी इंजिनांकडून शक्तिपुरवठा केला जाईल.   'बी एस ६' निकषांची पूर्तता करणारे हे छोटे ट्रक तयार करून 'टाटा मोटर्स 'ने भारतीय मोटार उत्पादन क्षेत्रात पुढचं पॉल टाकलं आहे. साडेपाच लाख रुपयांपासून पुढे किंमत असलेल्या या मालट्रकांमुळे छोटा हत्ती आणि एस या मालवाहू गाड्यांना नवे रूप प्राप्त झालं आहे.
         

           नवा आकर्षक चेहरा असलेली चालकाची कॅबिन, कारसारखा पॉश अंतर्भाग, आरामदायी बैठक आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट पॅनल ही या गाड्यांची प्रथमदर्शनीच नजरेत भरणारी वैशिष्ट्यं आहेत. मोठ्या आकाराची चालकांसमोरची काच, मोठे हेडलाईट आणि पूर्वीपेक्षा जास्त मोकळीक देणारी कॅबिनमधली जागा यामुळे चालकाला या गाड्या हाताळणं सोपं जाणार आहे. चालकाच्या आसनाला दिलेल्या हेडरेस्टबरोबरच डॅशबोर्डावर बसवलेल्या गिअरलीव्हरमुळे वारंवार गिअर बदलण्याचं काम सुलभ होईल. या गाडयांना पॉवर स्टिअरिंग  हे स्टॅंडर्ड उपकरण असल्याने चालकांचे श्रम कमी होणार आहेत.

          'टाटा ' ट्रकच्या चेहरेपट्टीची ओळख टिकवून ठेवणारं कॅबिनचं डिझाईन एनव्हीएच अर्थात आवाज, थरथर आणि उष्णतेची पातळी मर्यादित राखील असं उत्पादकांचं म्हणणं आहे.  म्युझिक सिस्टीम, मोबाईल चार्जिंग,  कुलुपयुक्त ग्लोव्ह बॉक्स, एचव्हीएसी, गिअर बदलण्याची सूचना देणारा गिअर शिफ्ट अडवायझर या सुविधा आहेत.

           यापैकी इंट्रा व्ही १० करिता  ७९८ सीसीचं दोन सिलिंडरचं प्रति मिनिट ३७५० फेऱ्यांत ३० किलोवॅट (४० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १७५० ते २५०० फेऱ्यांत ९६ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.

          इंट्रा व्ही २० करिता १३९६ सीसीचं चार सिलिंडरचं प्रति मिनिट ४००० फेऱ्यांत ५२ किलोवॅट (७० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १८०० ते ३००० फेऱ्यांत १४० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.  पाच गतीचा गिअरबॉक्स बसवला आहे.

          दोन्ही गाड्यांच्या इंजिनांत फरक असला तरी त्यांचं  सस्पेन्शन, टायर आणि हौद्याची मापं सारखीच आहेत. दोन्ही गाडयांना सस्पेन्शनसाठी स्प्रिंग पाटे वापरले असून त्यांची संख्या पुढे ६-६ आणि मागे ७-७ पाटे आहेत. १६५ आर १४ एलटी (१४ इंच ) रॅडियल टायर  वापरले आहेत. २५१२ मिमी X १६०३ मिमी (८.२ X ५.३ फूट) मापाचा हौदा आहे.

          दोन्ही गाडयांना दोन वर्षं किंवा ७२ हजार किलोमीटरची वॉरंटी आहे.








No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...