Sunday, August 18, 2019

भारतीय मोटार उद्योग मंदीच्या छायेत

शनिवारी सायंकाळी वृत्तसंस्थेकडून आलेल्या मोटारउद्योगविषयक वार्तापत्रांमध्ये जवळजवळ ९० टक्के बातम्या कुठल्या ना कुठल्या कारखान्यातील उत्पादनात घट, कारखान्यांचे ‘शट डाऊन’, तात्पुरत्या कामगारांची कपात आणि कायम कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल अशा प्रकारच्या होत्या. आजमितीस टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, होंडा, महिंद्रा यांसह भारतातील अनेक मोठ्या मोटार उत्पादकांच्या कारखान्यांत ही परिस्थिती आहे.

      ही परिस्थिती आताशी सामान्य नागरिकांना ठाऊक होऊ लागली असली तरी गेल्या वर्षभरापासूनच भारतीय मोटार कारखानदारी मंदीच्या सावटाखाली होती. ‘एसआयएएम’ (सियाम’) या भारतीय मोटार उत्पादकांच्या संघटनेने मे २०१९ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे देशातील एकूण वाहन विक्रीत १७ टक्के घट झाल्याचे दिसते. भारतात दोन चाकी, प्रवासी (तीन व चारचाकी), आणि व्यापारी (मालवाहू) अशी साधारण तीन वर्गांत वाहन विक्री होते. त्यात पुन्हा वाहनांतील बारीकसारीक फरकाने वर्गीकरण होते, त्याचा गुंता येथे नको.
     ही झाली वाहन विक्रीची घट. याशिवाय कारखान्यांच्या उत्पादन कपातीची व विक्रीतील घसरणीची  आकडेवारी आणि कामगार कपात किंवा पाळ्या बंदची माहिती भयावह आहे. मागची म्हणजे जुलै महिन्यात ‘मारुती सुझुकी’ या सर्वाधिक चारचाकी उत्पादकाने ३६.३० टक्के कमी वाहने विकली. ‘ह्युंदाई’ची विक्री १० टक्क्यांनी घसरली, ‘महिंद्रा’ची १६ टक्के, ‘टाटा’ची ३१ टक्के आणि ‘होंडा’ची तब्बल 48.67 टक्क्यांनी खाली आली.
        गेल्या आठ वर्षांत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. विक्रीतील या प्रचंड घसरणीमुळे बहुतेक सर्व मोटार उत्पादकांनी आपल्या कारखान्यांच्या कामकाजात खूप कपात केली आहे. कोणी आठवड्यातील काही दिवस तर कोणी सलगपणे काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.  ‘टाटा’च्या मालकीचा ‘जग्वार’ हा आलिशान मोटारींचा कारखानासुद्धा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ‘होंडा’ कारचे ग्रेटर नोइडामधील कारखान्यात होणारे उत्पादन पंधरा दिवस थांबविण्यात आले आहे; आणि तिचे राजस्थानातील कारखान्यात होणारे उत्पादन पूर्णतः थांबविले आहे.
       
मोटार जगत स्वातंत्र्यदिन विशेषांक 
बड्या कारखानदारांवर उत्पादन बंद करण्याची वेळ आली. त्याच वेळी त्यांना घटकभाग अथवा त्यांच्या उत्पादनांसाठी नंतरच्या सेवेकरिता (आफ्टर मार्केट) सुटे भाग पुरविणारे उद्योग तर आणखी अडचणीत आले आहेत. उदा. जमना इंडस्ट्रीज लि. नावाचा उद्योग टाटा मोटर्स, जनरल मोटर्स आणि टोयोटा या मोटार उत्पादकांना घटक भाग पुरवितो. मागणीतील कपातीमुळे आपले देशभरातील सर्वच्या सर्व नऊ कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर तो आला. अत्याधुनिक मोटारीना  लागणारी स्पार्क प्लग, फ्युएल इंजेक्शन यंत्रणा आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या ‘बॉश’सारख्या जगद्व्यापी उद्योगावर उत्पादन कमी करण्याची वेळ आली.
      मंदीच्या परिस्थितीचा सर्वात गंभीर बळी ठरणारा घटक म्हणजे कामगार. जगातील चौथ्या क्रमांकाचा मानला जाणारा भारतीय मोटार उद्योग हे लक्षावधी कामगारांना सामावून घेणारे आशास्थान आहे. ‘कौशल्य विकासा’च्या मूळ आराखड्यानुसार २०२२ पर्यंत ऑटोमोबाईल उद्योगात केवळ वाहतूक क्षेत्रातच ३८ लाख चालक आणि ८ लाखांहून अधिक दुय्यम कर्मचारी आवश्यक ठरतील असा अंदाज वर्तविला होता. त्याबरोबरच सुमारे ३५ लाख कर्मचारी मोटार दुरुस्ती क्षेत्र सामावून घेईल असेही ‘कौशल्य महामंडळा’ला वाटत होते. प्रत्यक्षात या मंदीमुळे लाखो कामगारांवर आहे ती नोकरी जाण्याच्या भीतीची टांगती तलवार आहे. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली त्याचा विचार पुढील भागात करू.   

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...