Monday, July 22, 2019

आता बाहेरुनही एअर बॅग

अपघातप्रसंगी येणार दोन गाड्यांच्या मध्ये 

अपघातप्रसंगी दोन वाहने एकमेकांवर आदळून प्रचंड हानी होते. वाहनांत बसलेल्यांच्या प्राणावर बेताने आणि अनेकदा प्राण जातातही. हे टाळण्यासाठी 'झेड एफ फ्राईडरिशचाफेन' या जर्मन कंपनीने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मोटारीच्या दोन्ही बाजूंना एअर बॅग बसवून गाडीवर बाजूने काही आदळताच त्या उघडतील असे तंत्र या कंपनीने विकसित केले आहे.

साधारणपणे १९९० पासून एअर बॅग या संरक्षक घटकाचा वापर वाहनांमध्ये वाढू लागला. भारतात हा प्रकार त्यामानाने उशिरा आला असला तरी आता युरो निकषांची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक गटातील गाडयांना चालकापुरती आणि वरच्या गटातील गाडयांना चालकाचा शेजारील आणि आतील प्रवासी या सर्वांसाठीच एअर बॅगची तरतूद करावी लागते. मोटारीच्या बाहेरच्या बाजूलाही एअर बॅग असली पाहिजे यासंबंधी अद्याप तरी कायद्याचे काही म्हणणे नाही, मात्र आतील एअर बॅगा वाहनात बसलेल्यांच्या सुरक्षेकरिता पुरेशा नाहीत असा विचार करून 'झेड एफ'ने बाहेरील एअर बॅगाही तयार केल्या आहेत.

या एअर बॅगा मोटारीच्या दोन्ही बाजूंना दरवाजांच्या तळाशी स्कर्टिंगवर बसविलेल्या असतात. एक तृतीयांशपेक्षा जास्त अपघात एका बाजूच्या धक्क्याचे असतात आणि त्यात प्राणहानीची शक्यताही असते. दुसरे वाहन बाजूने आदळले किंवा घासले अथवा त्याने वाहनाला एका बाजूने धडक दिली तर या बहिस्थ एअर बागेचे सेन्सर त्वरित कार्यान्वित होऊन आतील मध्यवर्ती संगणकाला सूचना देतात आणि एअर बॅग उघडते. ही सर्व प्रक्रिया धडक बसल्यापासून एका सेकंदाहूनही कमी वेळेत पार पडते. परिणामी आतल्या व्यक्तीला होणाऱ्या दुखापतीची तीव्रता अनेक पटींनी कमी होते.

साधारणपणे पुढच्या व मागच्या मडगार्डच्या मधली संपूर्ण जागा व्यापून या एअर बाग बसविलेल्या असतात आणि आतील सध्या उपलब्ध असणाऱ्या एअर बॅगांप्रमाणेच यांचेही कार्य चालते. मात्र या बॅगा विकसित करण्यासाठी 'झेड एफ'ला सहा सात वर्षे लागली. २०१२  मध्ये हे संशोधन कार्य सुरु झाले आणि नुकतेच ते यशाच्या पूर्णतेच्या टप्प्यात आले. मात्र रीतसर उत्पादन सुरु होण्यास २०२३ साल उजाडेल असे या कंपनीचे म्हणणे आहे. एअर बॅगचे  तंत्र प्रचारात असूनही इतका काळ लागण्याचे कारण असे की वाहन रस्त्याने चालताना विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक वस्तूंचा स्पर्श होतो, त्यामध्ये एखादा मनुष्य हलकासा आदळतोही, अशावेळी चटकन उघडण्याइतकी एअर बॅग अति संवेदनशीलही असता उपयोगी नाही, त्यामुळे संशोधन दीर्घ काळ चालले. मात्र भविष्यात स्वयंचलित वाहनांची वर्दळ वाढू लागली की या उपकरणाचा उपयोग फारच चांगला होईल असे कम्पनीतर्फे सांगण्यात आले.  

1 comment:

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...