नैसर्गिक वायू (CNG)हे इंधन वापरून चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून प्रसार होण्याचे उद्दिष्ट ठेवून ६ डिसेंबर २०१९ रोजी 'नॅचरल गॅस व्हेईकल कन्क्लेव्ह २०१९' हे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरणार आहे. ETAuto.com या मोटार उद्योगविषयक माध्यमातर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदूषण टाळून मोटारगाड्यांना शक्तीपुरवठा करणाऱ्या इंधनांशी संबंधित विविध प्रकारच्या माहितीचे आदानप्रदान या प्रदर्शनात करण्यात येईल.
दिवसभर आठ तास चालणाऱ्या या प्रदर्शनात नैसर्गिक वायू या इंधनाशी संबंधित विविध बाबींचे तज्ञ विचारविनिमय आणि मार्गदर्शनात सहभागी होतील. एकूण ५ सत्रे व प्रदर्शन दालने असून दोनशेहून अधिक वरिष्ठ औद्योगिक अधिकारी या प्रदर्शनासाठी उपस्थित राहतील. या प्रदर्शनाच्या निमित्त्ताने पुढलं विषयांवर उद्बोधक चर्चासत्रे आयोजित केली आहेत. त्यांमध्ये चर्चिले जाणारे विषय पुढीलप्रमाणे असतील -
- नैसर्गिक वायूवर चालणारी वाहने - वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून योग्य पर्याय;
- नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांमधील नवे तंत्रज्ञान, वायूची साठवणूक आणि इंधन पुरवठ्याचे मार्ग;
- नागरी टॅक्सी सेवा - नैसर्गिक वायूवरील वाहनांचे अग्रदूत;
- नैसर्गिक वायूवरील वाहनांची सुरक्षितता आणि प्रमाणीकरण
पेट्रोलियम इंधनांवरील प्रचंड खर्चात कपात करणे आणि खनिज तेलांच्या ज्वलनाने होणारे प्रदूषण कमी करणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी भारत सरकारने १२०० अब्ज (१ लाख २० हजार कोटी) रुपये खर्चाची गुंतवणूक असणारी गॅस इंधन पुरवठा संरचना करण्याची योजना आखली आहे. २०३० पर्यंत देशातील जवळजवळ ३०० जिह्यांमध्ये ही संरचना उभी राहील. दाबयुक्त नैसर्गिक वायू (CNG) आणि द्रवीय नैसर्गिक वायू (LNG) यांचा वाहनांना सुरळीत पुरवठा करता यावा यासाठी देशभर १५ हजार इंधन पम्प सुरु करण्यात येतील. पाच वर्षांपूर्वी देशात या प्रकारचे केवळ ९३८ पम्प होते, सध्या त्यांची संख्या १७६९ आहे.
विजेवर चालणारी वाहने वायूचे प्रदूषण टाळण्यास अत्यंत उपयुक्त असली तरी त्यांच्यासाठी आवश्यक ती पायाभूत संरचनेतील उणीवांचा विचार करता प्रदूषणविरहित वाहतुकीसाठी वायूवर चालणारी वाहने हा समर्पक पर्याय असल्याचे 'ETAuto.com या माध्यमाचे म्हणणे आहे. १ एप्रिल २०२० पासून मोटरपेठेत येणाऱ्या सुधारित बीएस ६ वाहनांना लागणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या तुलनेने नैसर्गिक वायू हे इंधन स्वस्त पडेल. या बाबी ध्यानात घेऊन अधिकाधिक देशवासियांपर्यंत नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांची माहिती पोहोचावी आणि प्रदूषणविरहित वाहतुकीसंबंधी नागरिकांचे प्रबोधन व्हावे याकरिता हे एका दिवसाचे प्रदर्शन उपयुक्त ठरेल.
या प्रदर्शनासंबंधीचे वृत्तांत 'मोटार जगत'चे छापील अंक आणि या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
No comments:
Post a Comment