Saturday, November 9, 2019

मोटार वाहतूक हे तसं विविध विषयांना स्पर्श करणारं क्षेत्र. पर्यटन हे त्यातलं एक. आपल्या करिअरचा केटरिंग आणि हॉटेल व्यवसायाने प्रारंभ करणारे रत्नागिरीचे दोन युवा उद्योजक कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांनी कोकण किनाऱ्यावरचा हा रम्य प्रदेश पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक पातळीवर अभिनव प्रयत्न केले. रम्य सागरकिनारा नि पाहण्यासारखी बरीच ठिकाणं असूनही रत्नागिरीस पर्यटक थांबत नाहीत ही या उद्योजक जोडगोळीला वाटणारी खंत होती आणि ती दूर करण्यासाठी त्यांनी पद्धतशीर व्यावसायिक योजना आखली. व्यावसायिकता आणि नैतिकतेची सुरेख सांगड घालत या दोघांनी हॉटेल आणि पर्यटन उद्योगात मिळविलेल्या यशाबद्दल नुकतीच त्यांची 'मुंबई दूरदर्शन'च्या 'सह्याद्री' वाहिनीवर मुलाखत झाली.
    "पर्यटन हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे," सुहास ठाकुरदेसाई मुलाखतीत सांगत होते "महाराष्ट्र हे नैसर्गिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक लेणं आहे. पर्यटनाचा पाहिजे तेवढा विकास राज्यात झाला नाही, केरळ, गोवा, राजस्थान यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी आहे.  रत्नागिरी हा सांस्कृतिक, पारंपरिक, धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक आणि खाद्यपदार्थ अशा सर्व प्रकारच्या पर्यटनाला अनुकूल असा एकमेव जिल्हा आहे, पण पर्यटन विकास झाला नाही. सरकार विकास करील असं म्हणत वाट पाहण्यापेक्षा व्यवसाय करताना पर्यटन वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले."
    दूरदर्शन निवेदिका नेहा परांजपे यांनी घेतलेल्या या पाऊण तासाच्या मुलाखतीत सुहास आणि कौस्तुभ या दोघांनाही आपल्या वाटचालीचा सविस्तर परामर्श घेता आला. कौस्तुभ सावंत म्हणाले, "रत्नागिरी शहरानजीक गणपतीपुळे हे प्रसिद्ध स्थळ आहे, तिथे येणाऱ्या पर्यटकांना या शहराकडे आकर्षून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. 'हर्षा हॉलिडेज' या नावाची पर्यटन सेवा सुरू केली. पर्यटकांना पाहण्यासारखं रत्नागिरी शहरात बरंच आहे, पण अनेकांना माहिती नाही. सर्वांना खुलं असलेलं पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळकांची जन्मभूमी, स्वा. सावरकरांना काही काळ ठेवलं होतं ती मध्यवर्ती कारागृहातील कोठडी, त्यांचं वास्तव्य असणारं घर, थिबा राजवाडा, रत्नदुर्ग किल्ला अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत, सगळी पहायची तर दोन दिवस पुरणार नाहीत."
   रत्नागिरी हे पर्यटकांच्या वास्तव्याचं ठिकाण झालं पाहिजे
, इथून आसपासची प्रेक्षणीय स्थळं दाखवता येतील. या उद्योजकांनी रत्नागिरीचं ऐतिहासिक रूप दाखविण्यासाठी 'हेरिटेज वॉक'ची योजना तयार केलीय, इथल्या समुद्र किनाऱ्यावर 'स्कुबा डायव्हिंग' अर्थात पाण्याखालील संचाराचा आनंद पर्यटकांना मिळवून देण्यासाठी तो उपक्रम सुरू केला, कौस्तुभचे भावोजी महेश शिंदे ती आघाडी सांभाळतात. पर्यटन विकासाकरिता सक्रिय योगदान देण्याचं हे एक साहसच, या साहसाला सलाम.


No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...