Saturday, December 29, 2018

वाहनचालकांमध्ये वाढतोय निष्काळजीपणा

मोटार वाहन हा दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक बनला आहे, मात्र वाहन वापरताना आवश्यक ती काळजी घेण्याचा संस्कार सामान्य भारतीयांमध्ये रुजल्याचे दिसत नाही. ‘फोर्ड’ या नामांकित मोटार उत्पादकांनी नुकत्याच केलेल्या एका पाहणीत जवळजवळ ३७% वाहनचालक गाडी हाताळताना निरनिराळ्या बाबतीत निष्काळजीपणे वागतात असे आढळले आहे. 
सविस्तर वृत्त पान सुरक्षा 

Friday, December 28, 2018

११ जानेवारीपासून पुणे ऑटो एक्स्पो

              नवनवी मोटार वाहने, सुटे भाग, वाहनांतील आरामदायी अक्सेसरीज, वाहनांच्या दुरुस्तीची अद्ययावत उपकरणे, वंगणे आणि तेले यांची भरपूर दालने असणारे 'पुणे ऑटो एक्स्पो'चे नव्या वर्षातील प्रदर्शन जानेवारीच्या ११ तारखेस सुरु होत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात गणेश कला इनडोअर स्टेडिअममध्ये ११ तेदरम्यान १४ जानेवारी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले असेल. त्याच दिवसांत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ते व्यवसायिकांकरिता खुले असेल.
         
 'स्मार्ट' शहरांकरिता पर्यावरणस्नेही वाहतूक ही मध्यवर्ती कल्पना (थीम) असणारे हे प्रदर्शन पुणे येथील 'एक्स्पो सेण्टर' तर्फे आयोजित करण्यात आले आहे,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, पूना ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन आणि स्कूटर मोटरसायकल रिपेअर्स रीसर्च असोसिएशन यांच्या सहकार्याने १२ व १३ तारखांना परिषद आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.  १२ जानेवारी रोजी वेस्टर्न इंडिया गॅरेज ओनर्स अँड मेकॅनिक्स मीट तसेच मोटार क्षेत्रातील विक्रेते, वितरक आणि व्यापारी यांची सभा होईल, याबरोबरच 'सप्लाय चेन मॅनेजमेंट सेमिनार पार पडेल. यातील सहभागासाठी प्रत्येकी ५००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता १०००/- रु शुल्क आकारण्यात येईल.          
            १३ जानेवारी रोजी विद्युत वाहनांवर विशेष प्रकाश टाकत 'पर्यावरण स्नेही वाहने ' या विषयावर परिसंवाद घेण्यात येईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २००/- रु. आणि तीन प्रतिनिधींकरिता ५००/- रु शुल्क आकारण्यात येईल.          
              

Wednesday, December 26, 2018

झटपट चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या केल्यात विकसित

       
      विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून अमलात आणले आहे. या  वाहनांच्या बॅटऱ्यांचे चार्जिंग करण्यासाठी ठिकठिकाणी चार्जिंग स्टेशने सुरु करण्याचीही व्यापक योजना आहे.  ही वाहने वापरण्यात चार्जिंगला लागणारा दीर्घ कालावधी, एका चार्जमध्ये कापायच्या अंतराची मर्यादा आणि बॅटऱ्यांची मोठी किंमत हे प्रमुख अडथळे आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका 'स्टार्ट अप ' कारखान्यात नवीन बॅटरी विकसित करण्यात आली आहे. प्रचलित लिथियम आयन बॅटऱ्यांपेक्षा त्या लवकर चार्ज होतील आणि त्यांची किमतीही कमी असेल असा दावा उत्पादकांनी केला आहे.
         गेगाडाइन एनर्जी नावाच्या स्टार्ट अप उद्योगाचे सीईओ जुबिन व्हर्गीस यांनी ही माहिती दिली. प्रचलित लिथियम आयन (एलआय ) बॅटऱ्यांहून निराळे तंत्र यामध्ये वापरले आहे.  एलआय बॅटऱ्यांमधील इलेक्ट्रोकेमिकल चार्जिंग आणि इलेक्ट्रोस्टॅटिक चार्जिंग यांचे एकत्रीकरण करून त्या चार्ज केल्या जातात. परिणामी त्यांचे चार्जिंग जवळजवळ ५० पट जलद गतीने होते. या बॅटऱ्या वापरून चालणाऱ्या वाहनांची चाचणी यशस्वी झाली आहे, येत्या वर्षभरात पथदर्शी पातळीवर त्या विक्रीसाठी उपलब्ध होतील.

रीव्हर्स पार्किंग अलर्ट आता होणार सक्तीचे 
कार, चार चाकींना जुलैपासून, २०२० पासून ट्रक, बसलाही अनिवार्य 

          वाहने पार्किंग अथवा अन्य कारणांसाठी मागे घेताना होणारे अपघात टाळण्यासाठी रीव्हर्स पार्किंग अलर्ट यंत्रणा सर्व प्रकारच्या वाहनांना बसविणे आता सक्तीचे होणार आहे. नुकत्याच जारी केलेल्या एका अध्यादेशाद्वारे  रस्ते वाहतूक मंत्रालयाने हे स्पष्ट केले. कार आणि इतर चार चाकी गाडयांना जुलै  २०१९पासून तर  ट्रक आणि बसगाडयांना एप्रिल २०२० पासून ही यंत्रणा अनिवार्यकरण्यात येणार आहे. यामध्ये रीव्हर्स कॅमेरा बसविणेही आवश्यक ठरण्याची शक्यता आहे. 

Sunday, December 23, 2018

अरे ! तारा नि हबशिवाय कसं फिरतंय हे चाक ?

खरं आहे, गाडीचं चाक म्हटलं की आस आला, बेअरिंग आलं, तारा म्हणजे स्पोक आले, पण आता या सगळ्यांना रजा द्यायचे दिवस जवळ आलेत. बघितलंत हे बिगर तारांच्या चाकांच्या मोटारसायकलचं चित्रं ? 
फिनलंडमधल्या 'आरएमके' नावाच्या वाहन तंत्रज्ञांच्या उत्साही गटाने ही अभिनव मोटारसायकल तयार केलीय. 'आरएमके ई २' असं नाव तिला दिलंय . विद्युत मोटरद्वारे शक्तीपुरवठा होणाऱ्या या मोटारसायकलीच मागचा चाक चेन, हब, स्पोक यापासून मुक्त आहे.
ही 'हबलेस ' चाकाची कल्पना तीस वर्षांची जुनी आहे.
अधिक माहितीसाठी पहा -पान  तंत्रज्ञान 

बघा, बघा... वेगळीच दिसतेय ही मोटारबाइक !!
..

२०१८ या सरत्या वर्षात ज्या प्रायोगिक मोटारसायकली नव्याने सादर करण्यात आल्या त्यांत टीएमसी ड्युमॉं ही 'टॉप लिस्टेड' ठरली. विमानाचं इंजिन बसविलेल्या या मोटारसायकलीत 'हबलेस' चाकाचं तंत्र तर वापरलयच, पण बांधणी आणि रचनेच्या दृष्टीनेही ती सर्वस्वी 'नवीन ' आहे.
अधिक माहितीसाठी पहा -पान  नवीन  

Thursday, December 20, 2018

उद्याच्या मोटारीचा एक नमुना 

ऑटोमोबाईल  क्षेत्रात 'बॉश ' हे नाव खूप प्रसिद्ध. मोटारगाडीमधल्या बहुतेक अत्याधुनिक व्यवस्था, मग ते फ्युएल इंजेक्शन असो, एबीएस असो, नाहीतर गाडीमधले संगणकीय नियंत्रक असोत. 'बॉश 'ची उपस्थिती आढळणार नाही असं वाहन सापडणं कठीण. असं असताना अख्खी मोटागाडीच बनवावी असं 'बॉश 'ला नाही वाटलं तरच नवल ! अन बॉश बनवणार तर टी साधीसुधी मोटार कशी असेल ? ती  असणार अतिप्रगत  तंत्रज्ञानाने युक्त अशी संगणक युगाला साजेलशी .......... 
आणखी वाचा - पान  - नवीन      

Sunday, December 16, 2018

नऊ अपघाती मृतांपैकी एक भारतीय 

          रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले २०१० - २०२० हे दशक संपायला अवघी दोन वर्षे उरली आहेत. मात्र अपघातांची आणि विशेषतः अपघाती मृत्यूंची संख्या म्हणावी तशी घटलेली नाही. जगभरातील अपघातांची आकडेवारी पहिली तर जगात कोठे ना कोठे दर २३ सेकंदांनी एक मनुष्य रस्त्यावरील अपघातात मरण पावतो. असे मृत्यू येणाऱ्यांपैकी दर नऊ व्यक्तीमागे एक भारतीय असते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती स्पष्ट झाली आहे.  
         २०१० ते २०२० हे दशक 'Action For Road Safety' म्हणून कार्यान्वित करण्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे ठरविण्यात आले होते. या दहा वर्षांच्या काळात रस्त्यावरील अपघाती मृत्यूची संख्या निम्म्यावर आणणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. परंतु ते साध्य करणे दूरच, मृतांच्या संख्येत वाढच होत असल्याचे दिसून आले आहे. २०१३ साली अपघाती मृतांची संख्या १२लाख ५० हजार होती, २०१६ साली ती एक लाखाने वाढून १३ लाख ५० हजार झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. गंभीर बाब अशी की या मृतांमध्ये ५ ते २९वर्षे वयोगटातील व्यक्तींचे (बालके आणि तरुण) प्रमाण अधिक आहे.
           त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे भारतातील रस्ते अपघातातील मृत्यूची संख्या ३% एवढी कमी झालीआहे.

Sunday, November 18, 2018

रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी उत्साहात दौडले रत्नागिरीकर

मोटार वाहन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. पण वाहन वापरतना पुरेशी काळजी घेणं, इतर रस्ते वापरणाऱ्यांबाबत सौजन्याने वागणं आणि पर्यावरणाची जपणूक करणं यादेखील तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा संदेश वाहनं आणि रस्ते वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'महावाकथॉन  २०१८ ' ही भव्य प्रभातफेरी रविवार दि १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात आला. रत्नागिरी येथील शेकडो नागरिकांनी या उपक्रमात आपला उत्सफूर्त सहभाग नोंदविला.
रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी 
सकाळी आठ वाजत रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या शेकडो सुरक्षाप्रिय नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी यांनी हिरवा झेंडा दाखविताच प्रभातफेरीचा प्रारंभ झाला. त्यावेळी सह जिल्हा न्यायाधीश श्री. बिले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांसह विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
अध्यक्षीय भाषण करताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण , उपस्थितांत डावीकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण,
आरटीओ कार्यालयापासून रत्नागिरी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ही प्रभातफेरी औद्योगिक क्षेत्रासमोरून दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर प्रवेशद्वारातून शहरात प्रवेशली. तेथील जलतरण तलावाशेजारील प्रांगणात उभारलेल्या व्यासपीठावरून मान्यवरांनी 'रस्ता सुरक्षा- हॉर्न नको-जबाबदार ड्रायविंग' असा संदेश दिला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधून घेणे हा या उपक्रमामागील एक उद्देश असल्याचे ते म्हणाले. एस टी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे प्रभारी नियंत्रक विजयकुमार दिवटे यांनी प्रचंड संख्येने प्रवासी वाहतूक करताण सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे काम महामंडळ करत असल्याचे सांगितले. रस्ते अपघातांतील बळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी यासंदर्भातील आकडेवारी सादर केली.
प्रभातफेरीत सहभागी झालेले एस टी कर्मचारी 
 अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रबळ केली पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या  अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. परदेशातील वाहतुकीचे आपण केलेले निरीक्षण नमूद करून स्वयंचलित वाहनांचावापर कमी करणे,पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच रस्त्यावर सौजन्याने वागणे या गोष्टीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून सुरक्षित प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी बस चालकांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. 
वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य लिपिक दादा कदम, ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळांचे संचालक, शालेय बस वाहतूक व रिक्षा वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी इत्यादींनी विशेष परिश्रम केले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविल्यानंतर चहापान होऊन कार्यक्रमाची  सांगता झाली.
(छायाचित्र सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी  )

Featured Post

 ' एन- टॉर्क 150 ' 149.7सीसी   ' ओ 3 सी टेक '  तीन व्हॉल्व्ह इंजिन बसवलेली नवी   ' एन- टॉर्क 150 '  शोरूममध्ये दाखल ...