Tuesday, June 11, 2019

हवा भरणं संपलं, पंक्चरचा जमाना गेला!


कोणत्याही वाहनात येऊ शकणारा पहिला दोष म्हणजे चाक पंक्चर होणं. खरं म्हणजे गाडी चालविणाऱ्या प्रत्येकाला अथवा प्रत्येकीला पंक्चर झालेलं चाक काढून दुसरं बसवता आलं पाहिजे. पण आता ती  गरज झपाट्यानं मागं पडतेय. मोटारसायकलला तर आधीपासूनच स्टेपनी म्हणजे जादा चाक नव्हतंच, ट्युबलेस टायर आल्यापासून सकूटरची स्टेपनीही गायब झालीय. कारला अद्याप तरी जादा चाक असतंच, पण अलीकडे सुरु असलेल्या एका नव्या प्रयोगानं त्याच्याही निवृत्तीचं शिंग फुंकण्याचा प्रारंभ केलाय. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर स्टेपनीच काय, पण टायरमध्ये हवा भरण्यापासून पंक्चर काढण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी इतिहासजमा होणार आहेत. महामार्गावर आणि लहानमोठ्या गावांत सहज दृष्टीस पडणारे 'टायरवाले अण्णा'देखील कदाचित दिसेनासे होतील; अन राहिलेच तर त्यांच्या पंक्चरच्या दुकानाचे चेहरे मोहरे पूर्ण बदललेले दिसतील, तिथं ते पंक्चर काढताना नव्हे तर निराळ्याच प्रकारच्या टायरची विक्री करताना अथवा ते निराळे टायर डिस्वर एखाद्या आधुनिक यंत्राच्या साहाय्याने बसवताना दिसतील.

          'युनिक पंक्चर प्रूफ टायर सिस्टीम (उप्तीस )' नावाच्या एका नव्या प्रणालीचा विकास करण्यासाठी  'मिशेलिन' ही जगप्रसिद्ध टायर उत्पादक कंपनी गेली काही वर्षं  सातत्यानं प्रयत्नशील आहेत. प्रख्यात 'शेव्हरोले' ब्रॅण्डची निर्माता कंपनी 'जनरल मोटर्स'बरोबर संयुक्तपणे या नव्या प्रकारच्या टायरची चाचणी करण्याची योजना तयार झाली आहे. 'ट्वील' (Tweel) नावाचं तंत्र वापरून मिशेलिननं हा टायर २००५ मध्ये प्रथम निर्माण केला. पाच कोटी डॉलर गुंतवून त्याच्या उत्पादनासाठी २०१४ साली कारखाना काढला, आणि बांधकाम, शेती यांसारख्या क्षेत्रात वापरायच्या वाहनांसाठी त्यांचा उपयोग केला जातोय. २०१७ साली झालेल्या 'मूव्ह ऑन समिती फॉर सस्टेनेबल मोबिलिटी' या अत्याधुनिक तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात 'मिशेलिन'नं 'उप्तीस'चं पहिलं सादरीकरण केलं.  'जनरल मोटर्स'बरोबर संयुक्तपणे करावयाच्या चाचणीत हा हवा न भरता गुबगुबीत होणारा टायर 'बोल्ट' या विद्युत मोटारीला बसविण्यात येणार आहे. सध्या 'एअरलेस टायर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अद्भुत वस्तूचं रीतसर उत्पादन २०२४ मध्ये सुरु करण्याचा मिशेलिन'च विचार आहे.

कसा काय चालतो हा बिनहवेचा टायर ?
अनेक रबरी थरांनी बनलेला एअरलेस टायर 
ट्वील (Tweel) नावाच्या तंत्राद्वारे विकसित केलेल्या टायरची रचना एकात एक असणाऱ्या दोन रबरी रिंगांना रबरी तारांनी (स्पोक) जोडलेल्या आकृतीसारखी असते. या दोन्ही रिंग जाड असतात आणि पुरेशा टणक पण लवचिक अशा रबरी तारांनी त्या एकमेकींना जोडलेल्या असतात. हा टायर पोकळ नसतो, पण हातगाडीच्या धातूच्या चाकावर बसवलेल्या नुसत्याच रबरी धावेसारखाही नसतो. ताशा टायरने धक्के बसतील, परंतु परस्परांना रबरी तारांनी (स्पोक) जोडल्यामुळे त्यांच्या मधल्या पोकळीत नैसर्गिकपणे असणारी हवाच धक्के शोषण्याचं काम करते. एखादा खिळा टायरमध्ये घुसला तर आतल्या ट्यूबला छिद्र पडून पंक्चर होण्यावर ट्युबलेस टायरमुळे उपाय सापडला, पण खिळा घुसल्यावर ट्युबलेस टायरमधली हवा हळूहळू जातेच, ट्यूब असलेल्या टायरसारखा तो एकदम बसत नाही इतकंच! या टायरचा खरा फायदा असा की पंक्चर झाल्यावर बहुतेक वेळा तो न बदलताच गाडी पुढे नेता येते आणि सावकाशीने दुरुस्ती करून घेता येते.  म्हणजे दुरुस्ती करावी लागतेच.


नेमकं इथंच 'एअरलेस टायर'चं काम सुरु होतं. यात खिळा घुसला की पहिल्या धावेच्या थरातून आरपार जातो, पण बंदिस्त हवेची भानगड नसल्यामुळं हवा गेल्यानं टायर बसण्याचा प्रश्नच येत नाही. खिळा तिथंच राहिला तरी ट्यूबला फाडत नेण्याचाही प्रश्न नसतो. टायरमधला खिळा घेऊन गाडी निर्वेधपणं पुढं जाते.

खुशाल न्या टोकदार खिळ्यांच्या पाटावरून ........!
समजा, मोठ्याशा अणकुचीदार दगडावर चाक चढलं तरी टायरला खाच किंवा चीर पडत नाही. बाहेरच्या धावेचा पृष्ठभाग दाबतो, आतापर्यंत टणक भासणारे रबरी स्पोक वाकतात, चाक फिरून दगडापलीकडं गेलं की टायर पुन्हा पहिल्यासारखा!

'मिशेलिन'चं  म्हणणं असं की जगात जवळजवळ २० कोटी टायर पुरेसे वापरून होण्याआधीच बदलले जातात. १२ % टायर फुटल्यानं तर ८%  टायर हवेच्या कमीजास्त प्रमाणामुळं वेडेवाकडे झिजल्यानं बदलावे लागतात. 'उप्तीस' प्रणालीतून बनवलेला 'एअरलेस टायर' ही हानी कमी करील असा विश्वास 'मिशेलिन'तर्फे व्यक्त करण्यात आलाय. हे टायर बसवलेली मोटार हवा भरलेल्या टायरच्या गाडीसारखी भरधाव आणि सहज पळू शकते हे सिद्ध झालं की 'एअरलेस टायर' प्रचारात येण्यास वेळ लागणार नाही.

 'प्लॅटिना एच गिअर' : कॉम्बो ब्रेक  पुरवलेली पहिली शम्भर सीसी भारतीय मोटारसायकल

११० सीसी क्षमतेची नवी 'प्लॅॅ‌‌‍‌‍‌‌‍टिना एच गिअर' बजाज ऑटोने नुकतीच मोटरपेठेत आणली. किकसोबत विद्युत स्टार्टरची सुविधा असलेल्या या मोटारसायकलला मागचा ब्रेक दाबताच पुढचाही आपोआप लागणारी 'कॉम्बो ब्रेक' यंत्रणा (सीबीएस) बसवली आहे. तसेच नायट्रॉक्स शॉक अबसॉर्बर बसवले आहेत, त्यामुळे ब्रेक लावताना संतुलन राखले जाऊन कमी अंतरात गाडी उभी राहणे आणि धक्क्यांची तीव्रता व झटके कमी होणे शक्य होईल. या सुविधा पुरवलेली 'प्लॅटिना एच गिअर' ही शम्भर सीसी गटातील पहिली भारतीय मोटारसायकल आहे.

म्हटलं तर 'क्लासिक', म्हटलं तर 'क्रॉस कंट्री'     
'क्लासिक' आणि 'अडव्हेंचर' अशा दोन्ही गटांत बसणारी 'स्क्रॅम्बलर १२०० XC ' ही नवी मोटारसायकल 'ट्रायम्फ'ने भारतीय मोटरपेठेत सादर केली आहे.  पावणेअकरा लाख रुपये किमतीला ती  शोरूममध्ये उपलब्ध होईल. 'थ्रक्सटन'चे इंजिन बसवलेली ही मोटारसायकल दैनंदिन वापरासाठीही उपयोगी पडेल आणि हौसेने करावयाच्या साहसी स्वारीसाठीही योग्य ठरेल.             या दोन्ही कामांसाठी विकसित केलेली स्वतंत्र चासीस, उर्ध्वमुखी सायलेन्सर, वाढीव रॉड क्लिअरन्स ही 'स्पोर्ट्स' मोटारसायकलची लक्षणे तिला पाहताक्षणीच ध्यानात येतात. झपाट्याने किंवा आणीबाणीच्या प्रसंगी  ब्रेक दाबताना गाडीचे संतुलन बिघडू नये यासाठी 'एबीएस' तर आहेच, त्याशिवाय 'स्लिप अँड असिस्ट क्लच', स्विच दाबून गरजेनुसार कार्यान्वित करता येणारी ट्रॅक्शन कंट्रोल यंत्रणा या विशेष सुविधा या गाडीसोबत पुरविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही...