दररोज सुमारे चारशे ट्रकांची ये-जा असणाऱ्या 'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड 'तर्फे ट्रकचालकांच्या रस्ता सुरक्षाविषयक प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. 'समजूतदार ट्रकचालक' हा स्लाईड शो दाखवून 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी उपस्थित ट्रकचालकांना सुरक्षित ड्रायव्हिंगविषयी प्रबोधनपर व्याख्यान दिले. जवळजवळ शंभर ट्रकचालकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
|
उदघाटनाच्या वेळी संबोधित करताना श्री. रवी,
सर्वश्री समीर गायकवाड, सुरेश चव्हाण, जोगळेकर. |
दरवर्षी जानेवारी महिन्यात पाळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला. कंपनीचे उपाध्यक्ष आणि युनिट हेड कॅप्टन रवी चंदर श्रीराम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. रस्ते वाहतुकीतील अपघातांच्या प्रमाणाचे गांभीर्य सांगून ' एका व्यक्तीचे प्राण वाचले तरी हे प्रमाण कमी होईल.' असे म्हणत प्रत्येक चालकाने त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
'मोटार जगत' आणि 'मसुरकर्स अकॅडमी ' यांच्या संयुक्त विद्यमाने 'समजूतदार ट्रकचालक' या स्लाईड शोच्या माध्यमातून सादर केलेल्या ट्रकचालकांच्या प्रबोधन आणि प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात श्री मसुरकर यांनी चालकांशी संवाद साधत चालकाचे देशातील वाहतूक व्यवसायातील स्थान स्पष्ट केले. या व्यवसायाचे अर्थकारण, अपघातांमध्ये असणारे मालट्रकांचे प्रमाण आणि महामार्ग तसेच अन्य रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण याची माहिती त्यांनी दिली. अपघातांची कारणे, ते टाळण्याचे उपाय आणि नवे तंत्रज्ञान याबद्दलही ते बोलले.
'मोटार जगत'च्या 'समजूतदार ट्रकचालक' या विशेषांकाच्या प्रती यावेळी चालकांमध्ये वितरित करण्यात आल्या. रत्नागिरी महामार्ग पोलिसांच्या आवाहनावरून प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाच्या निर्मितीसाठी सहकार्य केलेल्या आस्थापनांमध्ये 'जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड, जयगड ' या उद्योगाचा समावेश आहे.
(अंकासाठी भेट द्या : पान छापील अंक ')
'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड 'च्या जनसंपर्क तसेच अन्य विभागांचे अधिकारी समीर गायकवाड, श्री. जोगळेकर इत्यादी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. मोटार जगत परिवाराचे ज्येष्ठ सहकारी सुरेश चव्हाण यांनी ट्रक चालकांच्या सुरक्षाविषयक प्रबोधनासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल 'जेएसडब्ल्यू पोर्ट लिमिटेड ' आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.