Friday, August 23, 2019

चालकाशिवाय चालणारी बस सिंगापूरच्या रस्त्यावर

         
              चालक नसूनही रस्यावर सहज चालणारी, वाटेत माणूस आडवा येताच अलगद थांबणारी, चालक वाहक नसताही कुठेही न धडकता मागे (रिव्हर्स) येणारी नि  बस स्टॉपवर नेमक्या जागी उभी राहून प्रवाशांना आत घेणारी पूर्णपणे स्वयंचलित विद्युत बसगाडी सिंगापूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापरासाठी सज्ज झाली आहे. ही बस व्होल्व्हो कंपनीने तयार केली आहे. ३६ आसन क्षमतेच्या या बसची बॅटरी गाडी स्टॉपवर उभी असताना टपावर बसविलेल्या पेंटोग्राफच्या मार्फत ३ ते ६ मिनिटांत पुनर्भारित होऊ शकते. सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटीच्या प्रशस्त आवारात या चालकविरहित बसची यशस्वी चाचणी करण्यात आली. 
              ही बस कशी चालते त्याच्या प्रात्यक्षिकासाठी पहा हा व्हिडिओ :
  

Sunday, August 18, 2019

भारतीय मोटार उद्योग मंदीच्या छायेत

शनिवारी सायंकाळी वृत्तसंस्थेकडून आलेल्या मोटारउद्योगविषयक वार्तापत्रांमध्ये जवळजवळ ९० टक्के बातम्या कुठल्या ना कुठल्या कारखान्यातील उत्पादनात घट, कारखान्यांचे ‘शट डाऊन’, तात्पुरत्या कामगारांची कपात आणि कायम कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल अशा प्रकारच्या होत्या. आजमितीस टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, होंडा, महिंद्रा यांसह भारतातील अनेक मोठ्या मोटार उत्पादकांच्या कारखान्यांत ही परिस्थिती आहे.

      ही परिस्थिती आताशी सामान्य नागरिकांना ठाऊक होऊ लागली असली तरी गेल्या वर्षभरापासूनच भारतीय मोटार कारखानदारी मंदीच्या सावटाखाली होती. ‘एसआयएएम’ (सियाम’) या भारतीय मोटार उत्पादकांच्या संघटनेने मे २०१९ मध्ये जाहीर केल्याप्रमाणे देशातील एकूण वाहन विक्रीत १७ टक्के घट झाल्याचे दिसते. भारतात दोन चाकी, प्रवासी (तीन व चारचाकी), आणि व्यापारी (मालवाहू) अशी साधारण तीन वर्गांत वाहन विक्री होते. त्यात पुन्हा वाहनांतील बारीकसारीक फरकाने वर्गीकरण होते, त्याचा गुंता येथे नको.
     ही झाली वाहन विक्रीची घट. याशिवाय कारखान्यांच्या उत्पादन कपातीची व विक्रीतील घसरणीची  आकडेवारी आणि कामगार कपात किंवा पाळ्या बंदची माहिती भयावह आहे. मागची म्हणजे जुलै महिन्यात ‘मारुती सुझुकी’ या सर्वाधिक चारचाकी उत्पादकाने ३६.३० टक्के कमी वाहने विकली. ‘ह्युंदाई’ची विक्री १० टक्क्यांनी घसरली, ‘महिंद्रा’ची १६ टक्के, ‘टाटा’ची ३१ टक्के आणि ‘होंडा’ची तब्बल 48.67 टक्क्यांनी खाली आली.
        गेल्या आठ वर्षांत अशी परिस्थिती उद्भवली नव्हती. विक्रीतील या प्रचंड घसरणीमुळे बहुतेक सर्व मोटार उत्पादकांनी आपल्या कारखान्यांच्या कामकाजात खूप कपात केली आहे. कोणी आठवड्यातील काही दिवस तर कोणी सलगपणे काही दिवस उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.  ‘टाटा’च्या मालकीचा ‘जग्वार’ हा आलिशान मोटारींचा कारखानासुद्धा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ‘होंडा’ कारचे ग्रेटर नोइडामधील कारखान्यात होणारे उत्पादन पंधरा दिवस थांबविण्यात आले आहे; आणि तिचे राजस्थानातील कारखान्यात होणारे उत्पादन पूर्णतः थांबविले आहे.
       
मोटार जगत स्वातंत्र्यदिन विशेषांक 
बड्या कारखानदारांवर उत्पादन बंद करण्याची वेळ आली. त्याच वेळी त्यांना घटकभाग अथवा त्यांच्या उत्पादनांसाठी नंतरच्या सेवेकरिता (आफ्टर मार्केट) सुटे भाग पुरविणारे उद्योग तर आणखी अडचणीत आले आहेत. उदा. जमना इंडस्ट्रीज लि. नावाचा उद्योग टाटा मोटर्स, जनरल मोटर्स आणि टोयोटा या मोटार उत्पादकांना घटक भाग पुरवितो. मागणीतील कपातीमुळे आपले देशभरातील सर्वच्या सर्व नऊ कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याच्या टप्प्यावर तो आला. अत्याधुनिक मोटारीना  लागणारी स्पार्क प्लग, फ्युएल इंजेक्शन यंत्रणा आणि इतर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणाऱ्या ‘बॉश’सारख्या जगद्व्यापी उद्योगावर उत्पादन कमी करण्याची वेळ आली.
      मंदीच्या परिस्थितीचा सर्वात गंभीर बळी ठरणारा घटक म्हणजे कामगार. जगातील चौथ्या क्रमांकाचा मानला जाणारा भारतीय मोटार उद्योग हे लक्षावधी कामगारांना सामावून घेणारे आशास्थान आहे. ‘कौशल्य विकासा’च्या मूळ आराखड्यानुसार २०२२ पर्यंत ऑटोमोबाईल उद्योगात केवळ वाहतूक क्षेत्रातच ३८ लाख चालक आणि ८ लाखांहून अधिक दुय्यम कर्मचारी आवश्यक ठरतील असा अंदाज वर्तविला होता. त्याबरोबरच सुमारे ३५ लाख कर्मचारी मोटार दुरुस्ती क्षेत्र सामावून घेईल असेही ‘कौशल्य महामंडळा’ला वाटत होते. प्रत्यक्षात या मंदीमुळे लाखो कामगारांवर आहे ती नोकरी जाण्याच्या भीतीची टांगती तलवार आहे. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली त्याचा विचार पुढील भागात करू.   

Monday, July 22, 2019

आता बाहेरुनही एअर बॅग

अपघातप्रसंगी येणार दोन गाड्यांच्या मध्ये 

अपघातप्रसंगी दोन वाहने एकमेकांवर आदळून प्रचंड हानी होते. वाहनांत बसलेल्यांच्या प्राणावर बेताने आणि अनेकदा प्राण जातातही. हे टाळण्यासाठी 'झेड एफ फ्राईडरिशचाफेन' या जर्मन कंपनीने एक महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मोटारीच्या दोन्ही बाजूंना एअर बॅग बसवून गाडीवर बाजूने काही आदळताच त्या उघडतील असे तंत्र या कंपनीने विकसित केले आहे.

साधारणपणे १९९० पासून एअर बॅग या संरक्षक घटकाचा वापर वाहनांमध्ये वाढू लागला. भारतात हा प्रकार त्यामानाने उशिरा आला असला तरी आता युरो निकषांची पूर्तता करण्यासाठी प्राथमिक गटातील गाडयांना चालकापुरती आणि वरच्या गटातील गाडयांना चालकाचा शेजारील आणि आतील प्रवासी या सर्वांसाठीच एअर बॅगची तरतूद करावी लागते. मोटारीच्या बाहेरच्या बाजूलाही एअर बॅग असली पाहिजे यासंबंधी अद्याप तरी कायद्याचे काही म्हणणे नाही, मात्र आतील एअर बॅगा वाहनात बसलेल्यांच्या सुरक्षेकरिता पुरेशा नाहीत असा विचार करून 'झेड एफ'ने बाहेरील एअर बॅगाही तयार केल्या आहेत.

या एअर बॅगा मोटारीच्या दोन्ही बाजूंना दरवाजांच्या तळाशी स्कर्टिंगवर बसविलेल्या असतात. एक तृतीयांशपेक्षा जास्त अपघात एका बाजूच्या धक्क्याचे असतात आणि त्यात प्राणहानीची शक्यताही असते. दुसरे वाहन बाजूने आदळले किंवा घासले अथवा त्याने वाहनाला एका बाजूने धडक दिली तर या बहिस्थ एअर बागेचे सेन्सर त्वरित कार्यान्वित होऊन आतील मध्यवर्ती संगणकाला सूचना देतात आणि एअर बॅग उघडते. ही सर्व प्रक्रिया धडक बसल्यापासून एका सेकंदाहूनही कमी वेळेत पार पडते. परिणामी आतल्या व्यक्तीला होणाऱ्या दुखापतीची तीव्रता अनेक पटींनी कमी होते.

साधारणपणे पुढच्या व मागच्या मडगार्डच्या मधली संपूर्ण जागा व्यापून या एअर बाग बसविलेल्या असतात आणि आतील सध्या उपलब्ध असणाऱ्या एअर बॅगांप्रमाणेच यांचेही कार्य चालते. मात्र या बॅगा विकसित करण्यासाठी 'झेड एफ'ला सहा सात वर्षे लागली. २०१२  मध्ये हे संशोधन कार्य सुरु झाले आणि नुकतेच ते यशाच्या पूर्णतेच्या टप्प्यात आले. मात्र रीतसर उत्पादन सुरु होण्यास २०२३ साल उजाडेल असे या कंपनीचे म्हणणे आहे. एअर बॅगचे  तंत्र प्रचारात असूनही इतका काळ लागण्याचे कारण असे की वाहन रस्त्याने चालताना विशेषतः शहरातील गर्दीच्या ठिकाणी त्याच्या दोन्ही बाजूंना अनेक वस्तूंचा स्पर्श होतो, त्यामध्ये एखादा मनुष्य हलकासा आदळतोही, अशावेळी चटकन उघडण्याइतकी एअर बॅग अति संवेदनशीलही असता उपयोगी नाही, त्यामुळे संशोधन दीर्घ काळ चालले. मात्र भविष्यात स्वयंचलित वाहनांची वर्दळ वाढू लागली की या उपकरणाचा उपयोग फारच चांगला होईल असे कम्पनीतर्फे सांगण्यात आले.  

Sunday, July 14, 2019

'परिपूर्ण' सौर मोटारगाडी तयार होतेय!

सुरुवातीची सौर मोटारगाडी (सोलर कार)आपल्या नेहमीच्या मोटारीच्या टपावर एक आडवा लांब रुंद फळा ठेवल्यासारखी दिसे. अजूनही अशा प्रकारच्या मोटारी बनवून वापरात आणण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. अशी मोटार टपावरील सौर पॅनेलच्या साहाय्याने विजेची बॅटरी पुनर्भारित करते आणि तिच्या साहाय्याने चाकातील मोटार फिरून गाडीला गती मिळते.      आणखी वाचा 



Saturday, July 13, 2019

१२६२ सीसी क्षमतेची, अनेक प्रकारच्या तांत्रिक सुविधा पुरविलेली, चार चाकी एसयूव्हीप्रमाणे चढ रस्त्यावर मागे न येण्याची यंत्रणा बसविलेली हौशी मोटारसायकलस्वाराच्या कौशल्याला आव्हान देणारी 'दुकाटी मल्टिस्त्रादा DVT ट्विन नुकतीच भारतीय मोटरपेठेला खुली झाली. ३० लीटर क्षमतेची पेट्रोल टाकी असलेली आणि एकदा टाकी फुल्ल केली की तब्ब्ल ४५० किलोमीटर अंतर कापणारी ही मोटारसायकल रंगभेदानुसार  १९,९९००० आणि २०.२३,००० रुपये शोरूम किमतीला नवी दिल्लीत उपलब्ध आहे.                                                                             पुढे वाचा 

Wednesday, July 10, 2019

गरजेनुसार उघडणार इंजिनाचे व्हाल्व

CVVD तंत्रज्ञानावर चालणारी मोटार 
विजेवर चालणाऱ्या मोटारींना प्रोत्साहन देण्याचे धोरण अनेक देश आखत असले तरी पारंपरिक पेट्रोलियम इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये नवीन सुधारणा करण्याचे संशोधन वाहन उत्पादकांनी थांबविले नाही. इंजिनाचे व्हाल्व गरजेनुसार कमीजास्त वेळ उघडे राहण्याची क्लुप्ती ह्युंदाई कंपनीने शोधून काढली असून या नव्या तंत्रामुळे इंधनाची बचत, इंजिनाच्या शक्तीची वाढ आणि धुराच्या प्रमाणात भरपूर घट साध्य होईल असा दावा त्यांनी केला आहे. या तंत्रज्ञानाला CVVD (कंटिन्युअसली  व्हेरिएबल व्हाल्व ड्युरेशन) असे नाव दिले आहे. यापूर्वीच अस्तित्त्वात आलेल्या या दोन्ही यंत्रणांपेक्षा हे निराळे आणि अधिक प्रगत तंत्रज्ञान असल्याचे 'ह्युंदाई'तर्फे सांगण्यात आले आहे. आणखी वाचा

Tuesday, July 9, 2019

भारतातील पहिलीवहिली विद्युत 'एसयूव्ही'

           संपूर्ण विजेच्या शक्तीवर चालणारी भारतातील पहिलीवहिली 'एसयूव्ही' ह्युंदाई कंपनीने भारतीय मोटरपेठेत ९ जुलै रोजी दाखल केली. सुमारे २५ लाख रुपये किमतीची ही मोटार एकदा चार्ज केलेल्या बॅटरीच्या शक्तीवर ४४९ किमी अंतर कापू शकेल.

आणखी वाचा

Featured Post

 ' एन- टॉर्क 150 ' 149.7सीसी   ' ओ 3 सी टेक '  तीन व्हॉल्व्ह इंजिन बसवलेली नवी   ' एन- टॉर्क 150 '  शोरूममध्ये दाखल ...