Tuesday, June 11, 2019

हवा भरणं संपलं, पंक्चरचा जमाना गेला!


कोणत्याही वाहनात येऊ शकणारा पहिला दोष म्हणजे चाक पंक्चर होणं. खरं म्हणजे गाडी चालविणाऱ्या प्रत्येकाला अथवा प्रत्येकीला पंक्चर झालेलं चाक काढून दुसरं बसवता आलं पाहिजे. पण आता ती  गरज झपाट्यानं मागं पडतेय. मोटारसायकलला तर आधीपासूनच स्टेपनी म्हणजे जादा चाक नव्हतंच, ट्युबलेस टायर आल्यापासून सकूटरची स्टेपनीही गायब झालीय. कारला अद्याप तरी जादा चाक असतंच, पण अलीकडे सुरु असलेल्या एका नव्या प्रयोगानं त्याच्याही निवृत्तीचं शिंग फुंकण्याचा प्रारंभ केलाय. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर स्टेपनीच काय, पण टायरमध्ये हवा भरण्यापासून पंक्चर काढण्यापर्यंतच्या सर्वच गोष्टी इतिहासजमा होणार आहेत. महामार्गावर आणि लहानमोठ्या गावांत सहज दृष्टीस पडणारे 'टायरवाले अण्णा'देखील कदाचित दिसेनासे होतील; अन राहिलेच तर त्यांच्या पंक्चरच्या दुकानाचे चेहरे मोहरे पूर्ण बदललेले दिसतील, तिथं ते पंक्चर काढताना नव्हे तर निराळ्याच प्रकारच्या टायरची विक्री करताना अथवा ते निराळे टायर डिस्वर एखाद्या आधुनिक यंत्राच्या साहाय्याने बसवताना दिसतील.

          'युनिक पंक्चर प्रूफ टायर सिस्टीम (उप्तीस )' नावाच्या एका नव्या प्रणालीचा विकास करण्यासाठी  'मिशेलिन' ही जगप्रसिद्ध टायर उत्पादक कंपनी गेली काही वर्षं  सातत्यानं प्रयत्नशील आहेत. प्रख्यात 'शेव्हरोले' ब्रॅण्डची निर्माता कंपनी 'जनरल मोटर्स'बरोबर संयुक्तपणे या नव्या प्रकारच्या टायरची चाचणी करण्याची योजना तयार झाली आहे. 'ट्वील' (Tweel) नावाचं तंत्र वापरून मिशेलिननं हा टायर २००५ मध्ये प्रथम निर्माण केला. पाच कोटी डॉलर गुंतवून त्याच्या उत्पादनासाठी २०१४ साली कारखाना काढला, आणि बांधकाम, शेती यांसारख्या क्षेत्रात वापरायच्या वाहनांसाठी त्यांचा उपयोग केला जातोय. २०१७ साली झालेल्या 'मूव्ह ऑन समिती फॉर सस्टेनेबल मोबिलिटी' या अत्याधुनिक तंत्रज्ञानविषयक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात 'मिशेलिन'नं 'उप्तीस'चं पहिलं सादरीकरण केलं.  'जनरल मोटर्स'बरोबर संयुक्तपणे करावयाच्या चाचणीत हा हवा न भरता गुबगुबीत होणारा टायर 'बोल्ट' या विद्युत मोटारीला बसविण्यात येणार आहे. सध्या 'एअरलेस टायर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अद्भुत वस्तूचं रीतसर उत्पादन २०२४ मध्ये सुरु करण्याचा मिशेलिन'च विचार आहे.

कसा काय चालतो हा बिनहवेचा टायर ?
अनेक रबरी थरांनी बनलेला एअरलेस टायर 
ट्वील (Tweel) नावाच्या तंत्राद्वारे विकसित केलेल्या टायरची रचना एकात एक असणाऱ्या दोन रबरी रिंगांना रबरी तारांनी (स्पोक) जोडलेल्या आकृतीसारखी असते. या दोन्ही रिंग जाड असतात आणि पुरेशा टणक पण लवचिक अशा रबरी तारांनी त्या एकमेकींना जोडलेल्या असतात. हा टायर पोकळ नसतो, पण हातगाडीच्या धातूच्या चाकावर बसवलेल्या नुसत्याच रबरी धावेसारखाही नसतो. ताशा टायरने धक्के बसतील, परंतु परस्परांना रबरी तारांनी (स्पोक) जोडल्यामुळे त्यांच्या मधल्या पोकळीत नैसर्गिकपणे असणारी हवाच धक्के शोषण्याचं काम करते. एखादा खिळा टायरमध्ये घुसला तर आतल्या ट्यूबला छिद्र पडून पंक्चर होण्यावर ट्युबलेस टायरमुळे उपाय सापडला, पण खिळा घुसल्यावर ट्युबलेस टायरमधली हवा हळूहळू जातेच, ट्यूब असलेल्या टायरसारखा तो एकदम बसत नाही इतकंच! या टायरचा खरा फायदा असा की पंक्चर झाल्यावर बहुतेक वेळा तो न बदलताच गाडी पुढे नेता येते आणि सावकाशीने दुरुस्ती करून घेता येते.  म्हणजे दुरुस्ती करावी लागतेच.


नेमकं इथंच 'एअरलेस टायर'चं काम सुरु होतं. यात खिळा घुसला की पहिल्या धावेच्या थरातून आरपार जातो, पण बंदिस्त हवेची भानगड नसल्यामुळं हवा गेल्यानं टायर बसण्याचा प्रश्नच येत नाही. खिळा तिथंच राहिला तरी ट्यूबला फाडत नेण्याचाही प्रश्न नसतो. टायरमधला खिळा घेऊन गाडी निर्वेधपणं पुढं जाते.

खुशाल न्या टोकदार खिळ्यांच्या पाटावरून ........!
समजा, मोठ्याशा अणकुचीदार दगडावर चाक चढलं तरी टायरला खाच किंवा चीर पडत नाही. बाहेरच्या धावेचा पृष्ठभाग दाबतो, आतापर्यंत टणक भासणारे रबरी स्पोक वाकतात, चाक फिरून दगडापलीकडं गेलं की टायर पुन्हा पहिल्यासारखा!

'मिशेलिन'चं  म्हणणं असं की जगात जवळजवळ २० कोटी टायर पुरेसे वापरून होण्याआधीच बदलले जातात. १२ % टायर फुटल्यानं तर ८%  टायर हवेच्या कमीजास्त प्रमाणामुळं वेडेवाकडे झिजल्यानं बदलावे लागतात. 'उप्तीस' प्रणालीतून बनवलेला 'एअरलेस टायर' ही हानी कमी करील असा विश्वास 'मिशेलिन'तर्फे व्यक्त करण्यात आलाय. हे टायर बसवलेली मोटार हवा भरलेल्या टायरच्या गाडीसारखी भरधाव आणि सहज पळू शकते हे सिद्ध झालं की 'एअरलेस टायर' प्रचारात येण्यास वेळ लागणार नाही.

 'प्लॅटिना एच गिअर' : कॉम्बो ब्रेक  पुरवलेली पहिली शम्भर सीसी भारतीय मोटारसायकल

११० सीसी क्षमतेची नवी 'प्लॅॅ‌‌‍‌‍‌‌‍टिना एच गिअर' बजाज ऑटोने नुकतीच मोटरपेठेत आणली. किकसोबत विद्युत स्टार्टरची सुविधा असलेल्या या मोटारसायकलला मागचा ब्रेक दाबताच पुढचाही आपोआप लागणारी 'कॉम्बो ब्रेक' यंत्रणा (सीबीएस) बसवली आहे. तसेच नायट्रॉक्स शॉक अबसॉर्बर बसवले आहेत, त्यामुळे ब्रेक लावताना संतुलन राखले जाऊन कमी अंतरात गाडी उभी राहणे आणि धक्क्यांची तीव्रता व झटके कमी होणे शक्य होईल. या सुविधा पुरवलेली 'प्लॅटिना एच गिअर' ही शम्भर सीसी गटातील पहिली भारतीय मोटारसायकल आहे.

म्हटलं तर 'क्लासिक', म्हटलं तर 'क्रॉस कंट्री'     
'क्लासिक' आणि 'अडव्हेंचर' अशा दोन्ही गटांत बसणारी 'स्क्रॅम्बलर १२०० XC ' ही नवी मोटारसायकल 'ट्रायम्फ'ने भारतीय मोटरपेठेत सादर केली आहे.  पावणेअकरा लाख रुपये किमतीला ती  शोरूममध्ये उपलब्ध होईल. 'थ्रक्सटन'चे इंजिन बसवलेली ही मोटारसायकल दैनंदिन वापरासाठीही उपयोगी पडेल आणि हौसेने करावयाच्या साहसी स्वारीसाठीही योग्य ठरेल.             या दोन्ही कामांसाठी विकसित केलेली स्वतंत्र चासीस, उर्ध्वमुखी सायलेन्सर, वाढीव रॉड क्लिअरन्स ही 'स्पोर्ट्स' मोटारसायकलची लक्षणे तिला पाहताक्षणीच ध्यानात येतात. झपाट्याने किंवा आणीबाणीच्या प्रसंगी  ब्रेक दाबताना गाडीचे संतुलन बिघडू नये यासाठी 'एबीएस' तर आहेच, त्याशिवाय 'स्लिप अँड असिस्ट क्लच', स्विच दाबून गरजेनुसार कार्यान्वित करता येणारी ट्रॅक्शन कंट्रोल यंत्रणा या विशेष सुविधा या गाडीसोबत पुरविण्यात आल्या आहेत.

Monday, June 3, 2019

विजेवरच्या बसेसचा जमाना आलाय !

संपूर्णपणे विजेवर चालणाऱ्या बसगाड्या जिकडे तिकडे दिसण्याचे दिवस काही फार दूर राहिले नाहीत. जगातील प्रगत राष्ट्रांमध्ये त्या  प्रायोगिक तत्त्वावर पण मोठ्या संख्येने गेल्या तीन चार वर्षांपासूनच फिरत आहेत. भारतात विद्युत बसगाड्यांच्या वापराचा प्रारंभ दीड वर्षांपूर्वी झाला. मनाली ते रोहटक या ५१ किलोमीटरच्या मार्गावर विद्युत बससेवा सुरु करुन हिमाचल प्रदेशाने तो मन मिळविला. त्या ताफ्यात नऊ मीटर लांबीच्या गोल्डस्टोन बीवायडी बनावटीच्या बसेस समाविष्ट होत्या. अशोक लेलँड ही संपूर्ण विद्युत बसगाड्यांचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. आजमितीस हैदराबाद, चेन्नई, गौहत्ती इत्यादी महानगरांत शेकडो विद्युत बसगाड्या प्रवाशांची वाहतूक करत आहेत. त्या प्रायोगिक तत्त्वावर वापरल्या जात आहेत हे खरे, पण त्यासाठी उभी केलेली संरचना कायमच उपयोगी पडेल. बंगलोरमध्ये तर एकदम दीडहजार बसेस आणण्याचा प्रस्ताव आहे. या गाड्या प्रदूषणमुक्त असतात, शिवाय त्यांना इंधन लागत नाही, त्यामुळे बहुमूल्य खनिज तेलाची त्या बचत करतात ; परंतु त्यांची आणि त्या चालविण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या संरचनेची किंमत खूपच असते. हिमाचल प्रदेशात आणलेल्या गाड्या प्रत्येकी १ कोटी ७० लाख रुपये किमतीच्या आहेत. 

बस थांब्यावर होते बॅटरी चार्जिंग


विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांसाठी अत्यंत शक्तिशाली विद्युत मोटारी वापरल्या जातात. त्यांना अखंड वीज पुरवठा करण्याचे काम 'स्टोअरेज बॅटऱ्या ' करतात. या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी फार कालावधी मिळू शकत नाही. बसगाडीचे आकारमान आणि तीमधील प्रवाशांसह तिचे वजन पाहतां बॅटऱ्यांचे चार्जिंग लवकर कमी होऊ शकते. बसगाड्यांचे काम तर अनेक तास चालते आणि त्यामुळेच त्यांच्या बॅटर्यांच्या चार्जिंगची समस्या वाटेतच उद्भवू नये याकरिता झटपट चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या विकसित करण्यात आल्या आहेत.
           गेली तीनचार वर्षे युरोपमधील काही देशांमध्ये अतिझटपट चार्ज होणाऱ्या बॅटऱ्या वापरलेल्या बसगाड्या प्रचारात आहेत. सध्या तरी त्या प्रायोगिक तत्त्वावर चालतात, परंतु प्रायोगिक तत्त्व म्हटले कि आपल्याकडे तत्त्व एखादीच बस आणली जाते, तिची नवलाई प्रवाशांना आणि चालक-मेकॅनिक मंडळींनाही पुरून उरते. शेवटी पुरेशी वाहने आणि संरचनेअभावी प्रयोग फसतो. युरोप अमेरिकेत तसे नसते. या प्रकारच्या कित्येक बसगाड्यांचे ताफेच तिकडे 'प्रायोगिक तत्त्वावर' वापरले जातात.
            या बसगाड्या विशिष्ट मार्गिकेमधूनच चालतात. जेव्हा त्या एखाद्या थांब्याजवळ बस उभी राहते तेव्हा त्यांच्या खालून जमिनीतून एक यांत्रिक हात वर येऊन बसच्या तळाला स्पर्श करतो, त्यामुळे विद्युत प्रवाह चालू होऊन बॅटरी चार्ज होते. शहरांतर्गत वाहतुकीची बस थांब्यावर जेमतेम एक मिनिटभर उभी राहते. पण तेवढ्या अल्पावधीतही तिची बॅटरी अंशतः चार्ज केली जाते. सतत पुनर्भारित होत राहिल्याने बॅटरी वाटेतच उतरली असे होत नाही.
           या गाड्या थांब्यासमोरील चार्जिंग स्ट्रिप'वर नेमक्या जागी उभ्या कराव्या लागतात. त्यासाठी रेल्वे चालकाप्रमाणे अचूकपणे विशिष्ट ठिकाणी गाडी उभी करण्याचे प्रशिक्षण बस चालविणाऱ्याला दिले जाते. आपल्याकडे बसथांब्याच्या पुढेमागे खाजगी प्रवासी वाहनांची झुंबड असते. त्यातच प्रवाशांची गर्दी. बस आली कि थांब्यासमोर पण दार अंतरावर कुठेतरी नाहीतर पुढे जाऊन उभी राहते. मग प्रवाशांची धांदल आणि असे झाले तर बसथांब्यासमोरील जमिनीखालील 'चार्जिंग स्ट्रिप ' बाजूलाच पडणार! तेव्हा आपल्याकडे केवळ घोषणा देऊन आणि भपकेबाज जाहिराती छापून 'स्मार्ट बसवाहतूक' अस्तित्वात येणार नाही, त्यासाठी कार्यक्षमता,  अचूकता, वक्तशीरपणा, उच्च दर्जाचे प्रशिक्षण, दर्जेदार तंत्रज्ञानात्मक संरचना आणि नागरिकांची सामाजिक व सार्वजनिक शिस्त या बाबी सर्वानाच अंगात बाणवून घ्याव्या लागतील.

पहिली विजेवरची डबल डेकर  चालली लंडनमध्ये 

         विजेवर चालणारी गाडी आकाराने  लहान असली पाहिजे असे नाही. बीवायडी या कंपनीने लंडन शहरासाठी विजेवर चालणारी डबल डेकर तयार करण्याची कल्पना मांडली तेव्हा लंडनच्या महापौरांना  ती खरी वाटली नाही, पण त्या  'बीवायडी' ने खरोखरच तशी बस तयार केली,  ऑक्टोबर २०१५ मध्ये टी लंडनच्या रस्त्यावरून यशस्वीपणे धावली. 'लंडन ट्रान्सपोर्ट कंपनी'च्या साडेनऊ हजार बसेसच्या ताफ्यातल्या ९६ बसगाड्या संपूर्णपणे विजेवर चालतात.
        ह्युंदाई या प्रसिद्ध कोरियन उद्योगाने नुकतीच नवी संपूर्ण विद्युत डबल डेकर लंडनवासियांच्या सेवेसाठी सादर केली.  पूर्वीच्या १०.२ मीटर लांबीच्या बीवायडी बसच्या तुलनेत ही नवी बस मोठी १२.९ मीटर (४२ फूट) लांब आहे. तिची प्रवासी क्षमताही अधिक म्हणजे ७० इतकी आहे. गंमत अशी की  मजल्यावर फक्त ११ तर वरती ५९ प्रवासी बसतील. ७२ मिनिटांत  विद्युतभारित होणारी तिची बॅटरी ३०० किमी चालते. स्टेअरिंगच्या सहाय्याने या बसची पुढची व मागची चाके एकदम वळतात, परिणामी ४२ फूट लांब असूनही कमी जागेत टी सुलभ रीतीने हाताळता येते.
       

विजेवरच्या बसगाड्या आणि सुरळीत वाहतूक 

           
  विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांचे प्रमाण भराभर वाढणार हे आपण मागील आठवड्यात पाहिलं.  परंतु या गाड्यांसाठी जी प्राथमिक संरचना आवश्यक आहे ती  आपल्याकडे  नाही. बसगाड्यांची खरेदी करण्याचा सार्वजनिक महामंडळाचा निर्णय घोषित आला असला तरी या संरचनेच्या उभारणीची पावलं अद्याप पडू लागली नाहीत. ही संरचना म्हणजे नक्की काय असतं  ते पाहू.
              विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांच्या शक्तिशाली बॅटऱ्या पुनर्भारित (चार्ज) करण्यासाठी अत्यंत जलद काम करणारी उपकरणं आणि अखंड वीज पुरवठा या प्राथमिक गोष्टी आहेत. बसगाड्या दोन प्रकारे पुनर्भारित करत येतात, ते आपण यापूर्वी बीआरटीएस व्यवस्थेची माहिती घेताना पाहिलं. पुणे मुंबई नासिक या त्रिकोणातील मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांसाठी सरकार चार्जिंग स्थानकं उभारणार आहे.
              दुसरी आवश्यकता चालकांच्या प्रशिक्षणाची असते. सफाईने सध्याच्या बसगाड्या चालविणाऱ्या चालकाचं  खास प्रशिक्षण करणं काही कठीण नाही. तरीही भारतीय रहदारीत चालविण्याच्या त्यांच्या पारंपरिक सवयी बदलणं जाणीवपूर्वक करावं लागेल.
              विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या बॅटऱ्या ठराविक तासांपलीकडे काम करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचं पुनर्भारण वेळेवर व्हावं  लागेल. त्यात मुख्य अडथळा वाहतुकीच्या कोंडीचा होतो. अशा परिस्थितीत प्रसंगी जवळच्या चार्जिंग स्थानकाकडे जाण्यासाठी कमी रहदारीचे आणि कमी अंतराचे मार्ग निर्धारित करणं गरजेचं असतं. आपल्या देशात अनियमित पार्किंग, रस्त्याशेजारी अस्ताव्यस्त पडलेलं बांधकाम साहित्य, रस्त्यावरचे खड्डे आणि नियम मोडून चालविली जाणारी वाहनं या कारणांनी सर्वच रस्ते कोंडीग्रस्त असतात. कमी रहदारी असेल तेथे वाहनं उभी करून ठेवण्याची पद्धत सर्रास आढळते. त्यातच विजेवर चालणाऱ्या बसगाड्यांचा आकार मोठा असतो. आपल्याकडे कित्येक रस्ते बस जाण्याएवढे रुंद नसतात, वळणावर गाड्या नीट पलीकडे जात नाहीत म्हणून अवजड वाहनं नेता येत नाहीत.
             यानंतरचा मोठा अडथळा म्हणजे प्रशासनाच्या विविध विभागांमधील समन्वय. याचा आपल्याकडे फारच अभाव दिसतो.  एखादी यंत्रणा नादुरुस्त झाल्यावर ते कामच बंद पडतं. विजेवर चालणारी रेल्वे आपल्याला नवीन नाही, पण रेल्वे मार्ग हा पूर्णतः: रेल्वेच्याच मालकीचा असतो आणि त्यावरून चालणाऱ्या सगळ्या गाड्यांचं नियंत्रण रेल्वे एकहाती करते. रेल्वे रूळ, फलाट, रेल्वेच्या वीजवाहिन्या या सर्वांचीच दुरुस्ती  रेल्वे स्वत: करते. रस्त्याची गोष्ट वेगळी आहे. नगरपालिकेने रस्ता गुळगुळीत केला की दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुठल्यातरी खात्याचे मजूर कुदळफावडी घेऊन येतात आणि छान रस्त्याची वाट लावून टाकतात. असं झालं तर विजेच्या गाड्यांची वाहतूक बंद पडेल.

नव्याचा ध्यास घेणारा उद्योजक 

रत्नागिरीतील श्री स्वामी इन्जिनिअरिन्ग या उद्योगाने मालवाहू गाडीची लोड बॉडी बांधण्याचा व्यवसाय अलीकडेच सुरु केलाय. बॉडी बांधताना आधुनिक तंत्र वापरून वेल्डिंग केल्याने दर्जेदार काम होतं हे या उद्योगाचं वैशिष्ट्य. २०२०पर्यंत मालवाहू वाहनाला बंदिस्त लोड बॉडी असणं अनिवार्य होईल अशी शक्यता ध्यानात घेऊन या उद्योगाचे संस्थापक आणि चालक धनंजय कानिटकर यांनी हा उपक्रम हाती घेतलाय. मालवाहतुकीसाठी बंदिस्त बॉडी अनिवार्य झाली की या व्यवसायाला चांगली मागणी असेल या विचाराने त्यानी आपल्या कारखान्यात आधुनिक यंत्रसामुग्री उभारण्याचाही प्रारंभ केलाय.

प्राध्यापक आईवडिलांच्या पोटी जन्मलेले धनंजय कानिटकर यांनी रत्नागिरी शहरात एका छोट्याशा गाळ्यातील स्कूटर मोटारसायकल दुरुस्तीच्या गॅरेजची सुरुवात करुन उद्योगाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. समाधानकारक सेवेमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि व्यवसायाला जागा कमी पडू लागली. मग शहराशेजारील एमआयडीसी क्षेत्रात जागा घेऊन त्यानी वर्कशॉप सुरुकेलं. पस्तीस फुट लांबीची आरामबस नीटपणे उभी करुन धुता येईल एवढा मोठा वाशिंग राम्प रत्नागिरी शहरात त्यानीच प्रथम बांधला.

वरवर पाहता फॅब्रिकेशन वर्कशॉप चालविणाऱ्या कानिटकरांना आव्हान झेलण्याची पहिल्यापासूनच हौस, त्यामुळे ठराविक साच्याच्या कामात संतुस्त न राहता सतत नव्या कामाच्या मागे ते लागलेले असतात. यातूनच महाराष्ट्राबाहेर जाऊन शेजारच्या राज्यांतील औष्णिक वीज उद्योगाला लागणारी उपकरणं बनवून देण्याचं काम त्यांनी मिळवलं . कोळशाच्या साठयातून परिसरात उडणारी धूळ बाजूला करून आणि उष्णता कमी करून ताजी व शुद्ध हवा यंत्राला पुरविण्याचं काम करणारी एअर वाशर नावाचं  उपकरणं कानिटकर तयार करून पुरवत होते. याच साहसी आणि आव्हानं शोधण्याच्या वृत्तीमुळे त्यांना डोंगरभ्रमंती करण्याचा छंदही लागला.

नव्याने सुरु केलेल्या बॉड्या बांधण्याच्या कामासाठी 'मिग वेल्डिंग'चं तंत्र ते वापरतात. यामध्ये विजेच्या साहाय्याने वेल्डिंग केलं जातं, पण त्यासाठी ऑक्सिजन ऐवजी कार्बन डाय  ऑक्साईड वापरला जातो त्यामुळे वेल्डिंगच्या जागी पत्रा प्रमाणापेक्षा जास्त गरम होणं टळून  पत्र्याला वाकडेपणा (वारपेज ) येत नाही, निर्वात पोकळ्या (ब्लो होल ) राहत नाहीत, ग्राइंडिंग करावं लागत नाही.

सध्या ते तयार प्रोजेक्शन्चा गॅल्वनाइज्ड पत्रा वापरतात, त्याला बॉडीच्या गरजेनुसार आकार देण्यासाठी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे प्रेस मशीन तयार करण्याचं काम ते करत आहेत. सध्या त्यांच्या कारखान्यात दहा फूट लांबीपर्यंत बंदिस्त लोड बॉडी बांधण्याचं काम चालतं. कुलूप घालून बंद करता येईल अशी कंपनीत बनल्यासारखी बॉडी तयार करणारा उद्योग म्हणून त्यांची प्रसिद्धी होत आहे. 

              ह्युंदाई व्हेन्यू 

चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या गटातील ‘व्हेन्यू’ ही नवी SUV ‘ह्युंदाई’ने नुकतीच भारतीय आणि अमेरिकन मोटारपेठेत आणली. १.० लीटर तसेच १.२ लीटर क्षमतेचे पेट्रोल आणि १.४ लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन असे तीन पर्याय घेऊन ती दाखल झाली आहे.

भारतीय मोटरपेठेत ६.५ लाख आणि ११.१० लाख रुपयांच्या दरम्यान शोरूम किंमत असणारी 'ह्युंदाई व्हेन्यू' यापूर्वी ह्युंदाईने सादर केलेल्या 'क्रेटा'ची लहान आवृत्ती आहे असे प्रथमदर्शनी म्हणता येईल. 'क्रेटा ' पेक्षा कमी लांबी-रुंदी-उंची आणि कमी क्षमतेच्या इंजिनांचा पर्याय देणारी  ‘व्हेन्यू’ आत बसणाऱ्यांना सर्व आरामदायी  सुविधा पुरवील आणि अनेक एअर बॅगांच्या साहाय्याने त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज राहील. 

‘व्हेन्यू’ घेऊ इच्छिणाऱ्यांना दोन पेट्रोल आणि एक डिझेल अशी तीन इंजिने निवडीसाठी उपलब्ध आहेत.पेट्रोलची दोन्ही इंजिने 'कप्पा ' मालिकेतली अनुक्रमे १००० सीसी आणि १२०० सीसी क्षमतेची 'ड्युएल व्हीटीव्हीटी' तंत्रज्ञानाने युक्त आहेत. दर मिनिटाला ६००० फेऱ्यांमागे ती  अनुक्रमे ८३ आणि १२० पीएस शक्ती निर्माण करतात. १४०० सीसी क्षमतेचे यू २ सीआरडीआय डिझेल इंजिन प्रति मिनिट ४००० फेऱ्यांमागे ९० पीएस शक्ती निर्माण करते.   

इंजिन गिअरबॉक्स निवडीला भरपूर वाव:- ई, एस, एसएक्स # आणि एसएक्स (O) अशा चार प्रकारांत 'व्हेन्यू' मिळू शकते. १.२ लीटर पेट्रोल इंजिन हवे असेल तर फक्त मॅन्युअल ट्रान्स्मिशनसह - एमटी  (हाताने बदलायचे गिअर ) ई आणि एस हे प्रकार मिळतात;  १ लीटर पेट्रोल इंजिन हवे असेल तर  एसआणि एसएक्स # मध्ये एमटी किंवा डीसीटी (स्वयंचलित सात गिअर) असा निवडीला भरपूर वाव आहे; तर १४०० सीसी डिझेल इंजिन बसवलेली व्हेन्यू सर्व प्रकारांत फक्त एमटी म्हणजे हाताने गिअर बदलण्याच्या गिअरबॉक्ससह मिळते.

महत्त्वाच्या सुविधा सर्व प्रकारांत:- व्हेन्यूच्या सर्व प्रकारांत चालक आणि त्याचा शेजारी यांना एअर बॅग आणि ईबीडीसह एबीएस सुविधा पुरविल्या आहेत.
कोणतीही व्हेन्यू घेतली तरी  मिळणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे :

  • रिव्हर्स पार्किंग सेन्सर
  • रात्री काच काळसर होणारे आरसे
  • सेंट्रल लॉक आणि वेग वाढतच दरवाजांना कुलुपे लागणे 
  • धक्का बसताच दारांची  कुलुपे आपोआप उघडणे 
  • चालक व शेजाऱ्याला संरक्षक पट्ट्याची आठवण करणारी यंत्रणा 
  • इम्मोबिलायझर 
  • विद्युत पॉवर स्टिअरिंग आणि टिल्ट स्टिअरिंग 
  • लेन बदलताना इशारा देणारा दिवा 
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि चढ रस्त्यावर गाडी मागे येऊ न देणारा हिल असिस्ट या सुविधा मात्र फक्त स्वयंचलित (डीसीटी) गिअरबॉक्स बसवलेल्या मॉडेलवरच मिळतील. 



Sunday, May 26, 2019

टाटा 'इंट्रा ' - नवे छोटे मालवाहू ट्रक

           टाटा 'इंट्रा ' नावाचे दोन छोटे मालवाहू ट्रक 'टाटा मोटर्स 'ने नुकतेच मोटरपेठेत आणले. इंट्रा  व्ही १० आणि व्ही २० आशिया दोघांची नावं असून त्यांना अनुक्रमे ८०० आणि १४०० सीसी इंजिनांकडून शक्तिपुरवठा केला जाईल.   'बी एस ६' निकषांची पूर्तता करणारे हे छोटे ट्रक तयार करून 'टाटा मोटर्स 'ने भारतीय मोटार उत्पादन क्षेत्रात पुढचं पॉल टाकलं आहे. साडेपाच लाख रुपयांपासून पुढे किंमत असलेल्या या मालट्रकांमुळे छोटा हत्ती आणि एस या मालवाहू गाड्यांना नवे रूप प्राप्त झालं आहे.
         

           नवा आकर्षक चेहरा असलेली चालकाची कॅबिन, कारसारखा पॉश अंतर्भाग, आरामदायी बैठक आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट पॅनल ही या गाड्यांची प्रथमदर्शनीच नजरेत भरणारी वैशिष्ट्यं आहेत. मोठ्या आकाराची चालकांसमोरची काच, मोठे हेडलाईट आणि पूर्वीपेक्षा जास्त मोकळीक देणारी कॅबिनमधली जागा यामुळे चालकाला या गाड्या हाताळणं सोपं जाणार आहे. चालकाच्या आसनाला दिलेल्या हेडरेस्टबरोबरच डॅशबोर्डावर बसवलेल्या गिअरलीव्हरमुळे वारंवार गिअर बदलण्याचं काम सुलभ होईल. या गाडयांना पॉवर स्टिअरिंग  हे स्टॅंडर्ड उपकरण असल्याने चालकांचे श्रम कमी होणार आहेत.

          'टाटा ' ट्रकच्या चेहरेपट्टीची ओळख टिकवून ठेवणारं कॅबिनचं डिझाईन एनव्हीएच अर्थात आवाज, थरथर आणि उष्णतेची पातळी मर्यादित राखील असं उत्पादकांचं म्हणणं आहे.  म्युझिक सिस्टीम, मोबाईल चार्जिंग,  कुलुपयुक्त ग्लोव्ह बॉक्स, एचव्हीएसी, गिअर बदलण्याची सूचना देणारा गिअर शिफ्ट अडवायझर या सुविधा आहेत.

           यापैकी इंट्रा व्ही १० करिता  ७९८ सीसीचं दोन सिलिंडरचं प्रति मिनिट ३७५० फेऱ्यांत ३० किलोवॅट (४० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १७५० ते २५०० फेऱ्यांत ९६ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.

          इंट्रा व्ही २० करिता १३९६ सीसीचं चार सिलिंडरचं प्रति मिनिट ४००० फेऱ्यांत ५२ किलोवॅट (७० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १८०० ते ३००० फेऱ्यांत १४० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.  पाच गतीचा गिअरबॉक्स बसवला आहे.

          दोन्ही गाड्यांच्या इंजिनांत फरक असला तरी त्यांचं  सस्पेन्शन, टायर आणि हौद्याची मापं सारखीच आहेत. दोन्ही गाडयांना सस्पेन्शनसाठी स्प्रिंग पाटे वापरले असून त्यांची संख्या पुढे ६-६ आणि मागे ७-७ पाटे आहेत. १६५ आर १४ एलटी (१४ इंच ) रॅडियल टायर  वापरले आहेत. २५१२ मिमी X १६०३ मिमी (८.२ X ५.३ फूट) मापाचा हौदा आहे.

          दोन्ही गाडयांना दोन वर्षं किंवा ७२ हजार किलोमीटरची वॉरंटी आहे.








'फोर्स मोटर्स 'ची मध्यम क्षमतेची चार वाहनं

          मालवाहतुकीच्या क्षेत्रात 'फोर्स मोटर्स 'ने मध्यम क्षमतेची  चार वाहनं ग्राहकांना देऊ केली आहेत. त्यांपैकी दोन आहेत 'ट्रॅक्स क्रूझर 'च्या चेहऱ्याच्या आणि दोघांची चेहरेपट्टी रुबाबदार ट्रकची आहे. यांपैकी तीन वाहनांसाठी १९४७ सीसी क्षमतेची तीन सिलिंडर इंजिनं वापरली आहेत. छोट्या वाहनांमध्ये 'ट्रॅक्स कार्गो किंग स्टार ' आणि 'ट्रॅक्स कार्गो किंग ग्रँड ' तसंच 'शक्तिमान २००' यांचा या मालिकेत समावेश आहे. 'शक्तिमान ४००' नावाचं चौथं वाहन आकाराने फार मोठं नसूनही साडेतीन टन माल वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

          पहिल्या तीनही गाड्यांसाठी 'बीएस ४' निकष पूर्ण करणारं 'एफएम २.० सीआर ' नावाचं १९४७ सीसी क्षमतेचं कॉमन रेल डिझेल इंजिन वापरलं आहे. ते प्रति ३२०० फेऱ्यांत ६७ एचपी (५० किलोवॅट ) शक्ती निर्माण करतं; तसंच प्रति मिनिट १६०० ते २४०० फेऱ्यांत १७५ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. हे तीन सिलिंडरचं इंजिन असल्यामुळे आटोपशीर जागेत बसतं. हे टर्बो इंटरकूलर इंजिन आहे. त्याचा आवाज काहीसा मोठा वाटला तरी तीन सिलिंडर असूनही थरथर खूपच कमी आहे.

         'शक्तिमान ४००'साठी  'बीएस ४' निकष पूर्ण करणारं 'एफएम २.६ सीआर ' नावाचं २५९६ सीसी क्षमतेचं कॉमन रेल डिझेल इंजिन वापरलं आहे. ते प्रति २८००फेऱ्यांत ९० एचपी (६७ किलोवॅट ) शक्ती निर्माण करतं; तसंच प्रति मिनिट १४०० ते २४०० फेऱ्यांत २५० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. हे चार  सिलिंडरचं टर्बो इंटरकूलर इंजिन आहे.

         या चारही वाहनासाठी ओव्हरड्राइव्हसह पाच पुढचे अधिक रिवर्स असलेले सिंक्रोनायझिंग गिअरबॉक्स वापरले आहेत. सर्वांच्या मागच्या चाकांना गती पुरवठा होतो.

     
   'ट्रॅक्स कार्गो किंग स्टार ' - हा १२५० किलो (सव्वा टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक आठ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात मिळतो.  लांबी साडेसोळा  फूट (५०३२ मिमी ) आणि व्हील बेस पावणेनऊ फूट (३००० मिमी ) आहे. 

         या गाडीची चालकाची कॅबिन दोन आसन क्षमतेची बकेट सीटची आहे. आत बसताच अत्यंत आरामशीर वाटतं. मोजकेच मीटर आणि ठळक दिसणारे मोजकेच इंडिकेटर असणारं सुटसुटीत इन्स्ट्रुमेंट पॅनल हे कोणत्याही ट्रक चालकाला आवडेल.

         'ट्रॅक्स कार्गो किंग ग्रँड ' - हा १५०० किलो (दीड टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक आठ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात मिळतो. यामध्ये दुहेरी कॅबिन मॉडेलही आहे. लांबी साडेसतरा फूट (५३६० मिमी ) आणि व्हील बेस साडेदहा फूट (३२५० मिमी ) आहे.

         शक्तिमान -आखूड बॉनेटचे दोन 'शक्तिमान ' ट्रक ही या मालकेतील चांगली ऑफर आहे. उंच बांधणी आणि निमुळत्या आखूड बॉनेटमुळे चालकाला रस्त्यावरचं  दृश्य व्यवस्थित दिसू शकेल. या ट्रकांना पुढे बॉनेट असलं तरी त्यांची इंजिनं मात्र छोटा हत्ती किंवा आयशरसारखी चालकाच्या बैठकीखाली बसवली आहेत. त्यामुळे कॅबिनमधल्या जागेत अडचण वाटत नाही आणि चालकाच्या पायाला इंजिनच्या उष्णतेचा त्रास होण्याचंही टळतं. या 'मिड इंजिन' पद्धतीमुळे गाडी रिकामी पळताना अधिक स्थिरता मिळते. याशिवाय बॉनेट असूनही जास्त लांबीचा हौदा बसवता येतो. या वाहनांचे रेडिएटर मात्र बॉनेटमध्ये बसवले आहेत, ते इंजिनापासून दूर असल्याने तापमान मर्यादित राखणारी कूलिंग सिस्टीम अधिक कार्यक्षम होते.  रेडिएटर कूलंट, काच स्वच्छ करण्याचं पाणी आणि ब्रेक व पॉवर स्टिअरिंगचं तेल भरण्यासाठी बॉनेटमधून व्यवस्था आहे आणि तिथे इंजिनची गुंतागुंत नसल्याने चालकाचा  गोंधळ होण्याचं कारण नाही.  

       
        या दोन्ही मालट्रकांना प्रत्येकी चारच चाकं दिली आहेत. मात्र त्यांची मापं वेगवेगळी आहेत. दोहोंना पुढे मागे लीफ स्प्रिंग (पाटे ) आणि शॉकबसॉर्बर तसंच पुढे अँटिरोलबार दिले आहेत.  दोहोंकरिता साधं (मेकॅनिकल ) अथवा पॉवर स्टिअरिंग निवडता येतं.

        मध्यम आणि दूरच्या अंतरासाठी वापरण्यास हे दोन्ही ट्रक सोयीस्कर ठरतील. विशेषतः जनरेटर, इंजिनं, लेथ मशीन, छपाई मशीन, वृत्तपत्रीय कागदाच्या मोठ्या गुंडाळ्या यांसारख्या वजनदार पण कमी लांबी रुंदीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी ते योग्य वाटतात. अगदी कमी लांबी रुंदीमुळे शहरी गर्दीच्या रहदारीत हाताळायला सोपे आहेत.
              

   'शक्तिमान २०० ' - हा १७५० किलो (पावणेदोन टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक नऊ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात तसेच कॅबिन व पूर्ण उंचीच्या हौद्यासह मिळतो. यामध्ये दुहेरी कॅबिन मॉडेलही आहे. लांबी साडेपंधरा फूट (४७२५ मिमी ) आणि व्हील बेस नऊ फूट (२७७० मिमी ) आहे.
     
        या ट्रकला २१५/७५ आर १५ मापाचे रॅडियल टायर वापरले आहेत. पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. मागचे ब्रेक 'एलसीआरव्ही' या प्रकारचे आहेत. त्याचे शू जसजसे झिजतील तसतसे आपोआप जुळण्याची व्यवस्था आहे.

       'शक्तिमान ४००' - हा ३५०० किलो (साडेतीन टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक नऊ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात तसेच कॅबिन व पूर्ण उंचीच्या हौद्यासह मिळतो. यामध्ये पूर्ण उंचीच्या हौद्याच्या मॉडेलची क्षमता ३५०० किलो तर साध्या हौद्याच्या मॉडेलची क्षमता ३६२० किलो आहे. लांबी सव्वासतरा  फूट (५१७० मिमी ) आणि व्हील बेस सव्वादहा फूट (३१०० मिमी ) आहे.


     या ट्रकला ८.२५ X १६ मापाचे १६ प्लाय टायर वापरले आहेत. पुढे आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. मागचे ब्रेक 'एलसीआरव्ही' या प्रकारचे आहेत. त्याचे शू जसजसे झिजतील तसतसे आपोआप जुळण्याची व्यवस्था आहे.



करिष्मा मोटारसायकल : रॉयल एन्फिल्ड 

मोटारसायकल चालवणाऱ्या कोणत्याही भारतीयाच्या मनात 'बुलेट'विषयी एक वेगळाच दबदबा असतो. मूळ ब्रिटिश बनावटीच्या 'रॉयल एन्फिल्ड' या मोटारसायकलचा भारतात 'बुलेट ' या नावाने अनेक वर्षं वापर झाला. पण गेली काही वर्षं 'बुलेट'सह रॉयल एन्फिल्डची आणखीही मॉडेलं भारतीय मोटरपेठेत उपलब्ध आहेत.
रॉयल एन्फिल्ड मोटारसायकली ३५०, ५०० आणि ६५० सीसी क्षमतेच्या पेट्रोल इंजिनांसह उपलब्ध आहेत. यांपैकी ६५० सीसीचं इंजिन ट्विन सिलिंडरचं आहे.

१९३२ पासून मोटारसायकलस्वारांच्या मनात अढळ स्थान असलेली 'बुलेट', क्लासिक आणि थंडरबर्ड या तीन गाड्या ३४६ किंवा ४९९ सीसी इंजनसह मिळतात. प्रति मिनिट ७२५० फेऱ्यांत ४७ हॉर्सपावर शक्ती निर्माण करणारं ६४८ सीसी एअर /वॉटर कूल्ड इंजिन इंटरसेप्टर आणि जीटी कॉन्टिनेन्टल कॅफे रेसर गाड्यांसाठी वापरली आहेत. 'बुलेट', क्लासिक आणि थंडरबर्ड या एकेका सायलेन्सरच्या तर इंटरसेप्टर आणि जीटी कॉन्टिनेन्टल या दोन दोन सायलेन्सरच्या गाड्या आहेत. (काँटिनेंटलच्या टेस्ट राईड रिपोर्टसाठी पहा-मोटार जगत मार्च २०१५) याशिवाय हिमालया ही 'क्रॉस कंट्री' प्रकारातली ५०० सीसी मोटारसायकलही रॉयल एन्फिल्डने गेल्या वर्षी मोटारपेठेत उतरवली आहे.

मोठी इंजिनं असलेल्या या मोटारसायकली वेगवेगळ्या उद्देशाने वापरण्यासाठी निवडणं योग्य. नेहमीच्या वापरासाठी तसंच दूरच्या प्रवासासाठी अखंड बैठक असलेल्या बुलेट, थंडरबर्ड  अधिक चांगल्या. हौशी रुबाबदार स्वाराला एकेरी बैठकीची क्लासिक शोभून दिसेल. लष्करी रंगछटांची, काऊबॉय सजावट करता येण्यासारखी दुसरी कुठलीच मोटारसायकल भारतात रॉयल एन्फिल्ड क्लासिकच्या क्षमता आणि किंमत गटात उपलब्ध नाही.

भारतीय बनावटीच्या मोटारसायकलींमध्ये 'कॅफे रेसर' या प्रकारचं मॉडेल सध्या तरी फक्त रॉयल एन्फिल्ड जीटी कॉन्टिनेन्टल हेच आहे. या गाडीला स्लीपर क्लचसह सहा गतीचा गिअरबॉक्स आहे.  दूरच्या प्रवासात बाहू आणि छातीला अधिक सुखकर वाटण्यासाठी थंडरबर्डची निवड सार्थ ठरेल. सुपरबाइक वापरण्याची हौस असेल तर इंटरसेप्टर ही बजटमधली मोटारसायकल आहे. रॉयल एन्फिल्डच्या सर्व मॉडेलमध्ये रंगछटांच्या निवडीला पुष्कळच वाव आहे. प्रत्येक मॉडेलची रंगाची धाटणी (स्टाईल) निरनिराळी आहे आणि मॉडेलनुसार रंगही वेगवेगळे आहेत.

Friday, March 29, 2019

गॅरेजचा सुवर्णमहोत्सव, संस्थापकांचा अमृतमहोत्सव

                   
बंधू बाष्टे यांना शुभेच्छा देताना डावीकडून सर्वश्री सुभाष थरवळ,
मंदार सावंतदेसाई, विलास पाटणे व राजशेखर मलुष्टे. (छाया : मकरंद पटवर्धन )
         रत्नागिरी येथील ज्येष्ठ मेकॅनिक आणि 'मोटार जगत'चे सन्माननीय सल्लागार  (पहा- आम्ही) सुभाष श्रीराम तथा  बंधू बाष्टे यांनी नुकताच आपल्या आयष्याचे अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. योगायोग असा की याच महिन्यात 'सुभाष ऑटो रिपेअर्स' या त्यांच्या मोटार गॅरेजच्या स्थापनेला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या अनेक हितचिंतकांनी सुभाष ऑटो रिपेअर्स येथे त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
         संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात सुरु झालेल्या जिल्हावार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रत्नागिरी येथील 'आयटीआय'चाही समावेश होता. तेथे सुरु झालेल्या मोटार वाहन दुरुस्ती अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतून बंधू उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रख्यात मेकॅनिक आनंद स्वादी यांच्या वर्कशॉपमध्ये उमेदवारी केली आणि १९६९ च्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून रत्नागिरी येथे स्वतः;चे गॅरेज सुरु केले. मोटारीच्या रचनेचे व दुरुस्तीचे सखोल  ज्ञान, नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, व्यावसायिक सचोटी आणि स्वागतशील स्वभावामुळे  त्यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला. मोटारीव्यतिरिक्त इतर अनेक विषयांत असलेली गोडी, शहराच्या स्थानीय इतिहासाचे ज्ञान आणि सामाजिक वाटचालीचे सूक्ष्म निरीक्षण यामुळे बंधू विविध क्षेत्रांतील जाणकारांमध्येही लोकप्रिय झाले. त्यांची व्यावसायिक व सामाजिक योग्यता लक्षात घेऊन साप्ताहिक आरसा' आणि 'मोटार जगत'तर्फे त्यांना २००११ मध्ये 'मोटार जगत जीवन गौरव' प्रदान करण्यात आला होता. 
             बंधूंच्या वाढदिवसानिमित्त गॅरेजमध्ये झालेल्या अनौपचारिक आणि उत्स्फूर्त छोटेखानी मित्रमेळाव्याला वकील सर्वश्री राजशेखर मलुष्टे, विलास पाटणे, अशोक भिसे, 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मंदार सावंतदेसाई इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. बंधूचे सुपुत्र गौतम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गॅरेजचा सुवर्णमहोत्सव आणि संस्थापकांचा अमृतमहोत्सव असा दुग्धशर्करा  योग्य जुळून येणे ही बंधूंसाठीच नव्हे तर रत्नागिरीकरांसाठीही संस्मरणीय गोष्ट आहे असे श्री. मलुष्टे म्हणाले, तर बंधू हे 
मोटार क्षेत्रातील ज्येष्ठ सुसंस्कृत व्यक्तिमत्व असल्याचे 
श्री. पाटणे यांनी सांगितले. केवळ मोटारगाडीचेच नाही तर
इतिहास आणि अन्य अनेक विषयांचे बंधू बाष्टे
जाणकार आहेत अशा शब्दांत श्री. मसुरकर यांनी
त्यांचा गौरव केला.
बंधूंना शुभेच्छा देताना राजेंद्रप्रसाद मसुरकर, 
उजवीकडील चित्रात
प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे सुभाष श्रीराम तथा बंधू बाष्टे.
(छाया : मकरंद पटवर्धन )

Sunday, February 17, 2019

'कारखान्यात तयार केलेले रस्ते' प्रचारात आणणार - नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतभर उत्कृष्ट रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केले आहेत.'कारखान्यात तयार केलेले कृत्रिम रस्ते' प्रचारात आणण्याची कल्पना त्यांनी नुकतीच एका समारंभात मांडली.
 रस्त्यावरील वाहतूक गतिमान आणि सुरक्षित होण्यासाठी नवनवीन तंत्रांचा अवलंब करण्याबाबतही ते सतत अभ्यास करत असतात. याच उत्साही आणि नावीन्य शोधक वृत्तीतून प्रचलित पद्धतीने डांबरी अथवा सिमेंटचे रस्ते तयार करण्याऐवजी कारखान्यात रस्त्यांचे सुटे भाग बनवायचे आणि ते जागेवर आणून जोडायचे यावर संशोधन होण्याची गरज श्री. गडकरी यांनी बोलून दाखवली. अशा प्रकारे रस्ते तयार केल्यास रस्ते उभारणीच्या खर्चात ३० ते  ४० टक्के बचत होईल, रस्ते बांधणीच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याचे टाळता येईल आणि  एका रात्रीत रस्त्याची उभारणी शक्य होईल. प्लास्टिक कचऱ्याचा या प्रक्रियेत वापर केल्यामुळे पर्यावरणाच्या समस्येवरही प्रभावी उपाययोजना करता येईल असे मत त्यांनी प्रकट केले.                     आणखी वाचा - पान नवीन 

Tuesday, January 29, 2019

भारतीय ट्रक उद्योगात क्रांतीचे पाऊल - ट्रकवर एएमटी गिअरबॉक्स

स्वयंचलित गिअरबॉक्स बसविलेल्या मोटारी आता आपल्याकडे चांगल्या रुळल्या  आहेत, मात्र आजवर हा विषय कर आणि एसयूव्हीपुरताच मर्यादित होत.आता 'आयशर' या नामवंत ट्रक उत्पादकांनी अर्ध स्वयंचलित (ऑटोमेटिक मॅन्युअल ट्रान्समिशन - एएमटी ) ट्रक भारतीय मोटरपेठेत आणला आहे.  भारतात तयार होणारा हा या प्रकारचा पहिला ट्रक आहे. 'आयशर प्रो ३०१६' असे याचे नाव असून त्याची क्षमता १६ टन आहे.

मध्यम व्यावसायिक वाहन प्रकारात 'महिंद्रा'ची नवी ट्रक मालिका 
तीसपेक्षा जास्त व्यावसायिकांनी १३ लाख किलोमीटर वापर करून समाधान व्यक्त केल्यानंतर 'महिंद्रा ट्रक अँड बस' ने नवी 'फ्युएरो' ट्रक मालिका मोटरपेठेत उतरवली आहे. 'महिंद्रा अँड महिंद्रा'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ' पवन गोएंका यांनी आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसह त्याचे शानदार मीडिया सादरीकरण केले.    आणखी वाचा ....नवीन     

Featured Post

 ' एन- टॉर्क 150 ' 149.7सीसी   ' ओ 3 सी टेक '  तीन व्हॉल्व्ह इंजिन बसवलेली नवी   ' एन- टॉर्क 150 '  शोरूममध्ये दाखल ...