Tuesday, May 1, 2018

‘टाटा मोटर्स’ने बनवली भारतातली पहिली हायड्रोजन फ्युएल सेल बस

(२२ मे २०१८) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या उद्योगाच्या सहयोगाने ‘टाटा मोटर्स’ने हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी पहिली भारतीय बस विकसित केली आहे. नेहमीच्या मोटारीप्रमाणे ही बस धुराचे लोट सोडत नाही, तर फक्त पाणी (वाफेच्या रूपात) बाहेर टाकते, शिवाय ती आवाजही करत नाही, त्यामुळे पर्यावरणपूरक म्हणून भारतातील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीत ती मोठी क्रांती घडवून आणू शकेल. मात्र शांतपणे चालणाऱ्या या बसच्या इंजिनातून बऱ्यापैकी उष्ण वाफा बाहेर टाकल्या जातील. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांवर या उष्णतेचा कितपत परिणाम होतो ते पाहावे लागेल. सध्या तिच्या विविध चाचण्या सुरु आहेत.



      ‘स्टारबस’ मालिकेतील या बसच्या फ्युएल सेलकडून ११४ हॉर्सपॉवर आणि विद्युत संक्रामक मोटारद्वारे २५० हॉर्सपॉवर एवढी शक्ती निर्माण होते, तर प्रतिमिनिट ८०० फेऱ्यात १०५० न्यूटन मीटर टोर्क निर्माण केला जातो. परंपरिक इंधनावर चालणारी इंजिने इंधनातील रासायनिक उर्जेचे यांत्रिक उर्जेत रूपांतर करताना २०% क्षमता प्रकट करतात, फ्युएल सेलच्या इंजिनकडून हीच क्षमता ४० ते ६० % पर्यंत वाढल्याचे आढळते.
‘टाटा’ने तयार केलेल्या या गाडीचा अंतर्भाग आकर्षक आणि ऐसपैस आहे हे चित्रावरून लक्षात येईलच. तिची आसनक्षमता ३० आहे.
शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ही प्रदूषणविरहित बस भविष्यात फारच उपयुक्त ठरेल. तिच्या निर्मितीमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचेही (इस्रो) योगदान आहे. अशा प्रकारच्या बसगाड्या पुरविण्यासाठी ‘टाटा मोटर्स’ने ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’बरोबर (MMRDA) करार केला आहे. 

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...