Sunday, November 18, 2018

रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठी उत्साहात दौडले रत्नागिरीकर

मोटार वाहन हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय. पण वाहन वापरतना पुरेशी काळजी घेणं, इतर रस्ते वापरणाऱ्यांबाबत सौजन्याने वागणं आणि पर्यावरणाची जपणूक करणं यादेखील तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा संदेश वाहनं आणि रस्ते वापरणाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'महावाकथॉन  २०१८ ' ही भव्य प्रभातफेरी रविवार दि १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यभर राबविण्यात आला. रत्नागिरी येथील शेकडो नागरिकांनी या उपक्रमात आपला उत्सफूर्त सहभाग नोंदविला.
रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी 
सकाळी आठ वाजत रत्नागिरी येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या शेकडो सुरक्षाप्रिय नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हा न्यायाधीश आर एन जोशी यांनी हिरवा झेंडा दाखविताच प्रभातफेरीचा प्रारंभ झाला. त्यावेळी सह जिल्हा न्यायाधीश श्री. बिले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांसह विविध कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
अध्यक्षीय भाषण करताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण , उपस्थितांत डावीकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण,
आरटीओ कार्यालयापासून रत्नागिरी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ही प्रभातफेरी औद्योगिक क्षेत्रासमोरून दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर प्रवेशद्वारातून शहरात प्रवेशली. तेथील जलतरण तलावाशेजारील प्रांगणात उभारलेल्या व्यासपीठावरून मान्यवरांनी 'रस्ता सुरक्षा- हॉर्न नको-जबाबदार ड्रायविंग' असा संदेश दिला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले. वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चालकांचे पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधून घेणे हा या उपक्रमामागील एक उद्देश असल्याचे ते म्हणाले. एस टी महामंडळाच्या रत्नागिरी विभागाचे प्रभारी नियंत्रक विजयकुमार दिवटे यांनी प्रचंड संख्येने प्रवासी वाहतूक करताण सुरक्षेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे काम महामंडळ करत असल्याचे सांगितले. रस्ते अपघातांतील बळीचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगून अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी यासंदर्भातील आकडेवारी सादर केली.
प्रभातफेरीत सहभागी झालेले एस टी कर्मचारी 
 अपघातांचे प्रमाण कमी करायचे असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक प्रबळ केली पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या  अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. परदेशातील वाहतुकीचे आपण केलेले निरीक्षण नमूद करून स्वयंचलित वाहनांचावापर कमी करणे,पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे तसेच रस्त्यावर सौजन्याने वागणे या गोष्टीची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली. कोकणातील वळणावळणाच्या रस्त्यांवरून सुरक्षित प्रवासी वाहतूक करणाऱ्या एस टी बस चालकांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. 
वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'मोटार जगत'चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्य लिपिक दादा कदम, ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळांचे संचालक, शालेय बस वाहतूक व रिक्षा वाहतूक संघटनांचे पदाधिकारी, नगर परिषद कर्मचारी इत्यादींनी विशेष परिश्रम केले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताची धून वाजविल्यानंतर चहापान होऊन कार्यक्रमाची  सांगता झाली.
(छायाचित्र सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी  )

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...