Sunday, May 26, 2019

टाटा 'इंट्रा ' - नवे छोटे मालवाहू ट्रक

           टाटा 'इंट्रा ' नावाचे दोन छोटे मालवाहू ट्रक 'टाटा मोटर्स 'ने नुकतेच मोटरपेठेत आणले. इंट्रा  व्ही १० आणि व्ही २० आशिया दोघांची नावं असून त्यांना अनुक्रमे ८०० आणि १४०० सीसी इंजिनांकडून शक्तिपुरवठा केला जाईल.   'बी एस ६' निकषांची पूर्तता करणारे हे छोटे ट्रक तयार करून 'टाटा मोटर्स 'ने भारतीय मोटार उत्पादन क्षेत्रात पुढचं पॉल टाकलं आहे. साडेपाच लाख रुपयांपासून पुढे किंमत असलेल्या या मालट्रकांमुळे छोटा हत्ती आणि एस या मालवाहू गाड्यांना नवे रूप प्राप्त झालं आहे.
         

           नवा आकर्षक चेहरा असलेली चालकाची कॅबिन, कारसारखा पॉश अंतर्भाग, आरामदायी बैठक आणि इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट पॅनल ही या गाड्यांची प्रथमदर्शनीच नजरेत भरणारी वैशिष्ट्यं आहेत. मोठ्या आकाराची चालकांसमोरची काच, मोठे हेडलाईट आणि पूर्वीपेक्षा जास्त मोकळीक देणारी कॅबिनमधली जागा यामुळे चालकाला या गाड्या हाताळणं सोपं जाणार आहे. चालकाच्या आसनाला दिलेल्या हेडरेस्टबरोबरच डॅशबोर्डावर बसवलेल्या गिअरलीव्हरमुळे वारंवार गिअर बदलण्याचं काम सुलभ होईल. या गाडयांना पॉवर स्टिअरिंग  हे स्टॅंडर्ड उपकरण असल्याने चालकांचे श्रम कमी होणार आहेत.

          'टाटा ' ट्रकच्या चेहरेपट्टीची ओळख टिकवून ठेवणारं कॅबिनचं डिझाईन एनव्हीएच अर्थात आवाज, थरथर आणि उष्णतेची पातळी मर्यादित राखील असं उत्पादकांचं म्हणणं आहे.  म्युझिक सिस्टीम, मोबाईल चार्जिंग,  कुलुपयुक्त ग्लोव्ह बॉक्स, एचव्हीएसी, गिअर बदलण्याची सूचना देणारा गिअर शिफ्ट अडवायझर या सुविधा आहेत.

           यापैकी इंट्रा व्ही १० करिता  ७९८ सीसीचं दोन सिलिंडरचं प्रति मिनिट ३७५० फेऱ्यांत ३० किलोवॅट (४० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १७५० ते २५०० फेऱ्यांत ९६ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.

          इंट्रा व्ही २० करिता १३९६ सीसीचं चार सिलिंडरचं प्रति मिनिट ४००० फेऱ्यांत ५२ किलोवॅट (७० एचपी ) शक्ती निर्माण करणारं इंजिन वापरलं आहे. ते प्रति मिनिट १८०० ते ३००० फेऱ्यांत १४० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं.  पाच गतीचा गिअरबॉक्स बसवला आहे.

          दोन्ही गाड्यांच्या इंजिनांत फरक असला तरी त्यांचं  सस्पेन्शन, टायर आणि हौद्याची मापं सारखीच आहेत. दोन्ही गाडयांना सस्पेन्शनसाठी स्प्रिंग पाटे वापरले असून त्यांची संख्या पुढे ६-६ आणि मागे ७-७ पाटे आहेत. १६५ आर १४ एलटी (१४ इंच ) रॅडियल टायर  वापरले आहेत. २५१२ मिमी X १६०३ मिमी (८.२ X ५.३ फूट) मापाचा हौदा आहे.

          दोन्ही गाडयांना दोन वर्षं किंवा ७२ हजार किलोमीटरची वॉरंटी आहे.








'फोर्स मोटर्स 'ची मध्यम क्षमतेची चार वाहनं

          मालवाहतुकीच्या क्षेत्रात 'फोर्स मोटर्स 'ने मध्यम क्षमतेची  चार वाहनं ग्राहकांना देऊ केली आहेत. त्यांपैकी दोन आहेत 'ट्रॅक्स क्रूझर 'च्या चेहऱ्याच्या आणि दोघांची चेहरेपट्टी रुबाबदार ट्रकची आहे. यांपैकी तीन वाहनांसाठी १९४७ सीसी क्षमतेची तीन सिलिंडर इंजिनं वापरली आहेत. छोट्या वाहनांमध्ये 'ट्रॅक्स कार्गो किंग स्टार ' आणि 'ट्रॅक्स कार्गो किंग ग्रँड ' तसंच 'शक्तिमान २००' यांचा या मालिकेत समावेश आहे. 'शक्तिमान ४००' नावाचं चौथं वाहन आकाराने फार मोठं नसूनही साडेतीन टन माल वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

          पहिल्या तीनही गाड्यांसाठी 'बीएस ४' निकष पूर्ण करणारं 'एफएम २.० सीआर ' नावाचं १९४७ सीसी क्षमतेचं कॉमन रेल डिझेल इंजिन वापरलं आहे. ते प्रति ३२०० फेऱ्यांत ६७ एचपी (५० किलोवॅट ) शक्ती निर्माण करतं; तसंच प्रति मिनिट १६०० ते २४०० फेऱ्यांत १७५ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. हे तीन सिलिंडरचं इंजिन असल्यामुळे आटोपशीर जागेत बसतं. हे टर्बो इंटरकूलर इंजिन आहे. त्याचा आवाज काहीसा मोठा वाटला तरी तीन सिलिंडर असूनही थरथर खूपच कमी आहे.

         'शक्तिमान ४००'साठी  'बीएस ४' निकष पूर्ण करणारं 'एफएम २.६ सीआर ' नावाचं २५९६ सीसी क्षमतेचं कॉमन रेल डिझेल इंजिन वापरलं आहे. ते प्रति २८००फेऱ्यांत ९० एचपी (६७ किलोवॅट ) शक्ती निर्माण करतं; तसंच प्रति मिनिट १४०० ते २४०० फेऱ्यांत २५० न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. हे चार  सिलिंडरचं टर्बो इंटरकूलर इंजिन आहे.

         या चारही वाहनासाठी ओव्हरड्राइव्हसह पाच पुढचे अधिक रिवर्स असलेले सिंक्रोनायझिंग गिअरबॉक्स वापरले आहेत. सर्वांच्या मागच्या चाकांना गती पुरवठा होतो.

     
   'ट्रॅक्स कार्गो किंग स्टार ' - हा १२५० किलो (सव्वा टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक आठ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात मिळतो.  लांबी साडेसोळा  फूट (५०३२ मिमी ) आणि व्हील बेस पावणेनऊ फूट (३००० मिमी ) आहे. 

         या गाडीची चालकाची कॅबिन दोन आसन क्षमतेची बकेट सीटची आहे. आत बसताच अत्यंत आरामशीर वाटतं. मोजकेच मीटर आणि ठळक दिसणारे मोजकेच इंडिकेटर असणारं सुटसुटीत इन्स्ट्रुमेंट पॅनल हे कोणत्याही ट्रक चालकाला आवडेल.

         'ट्रॅक्स कार्गो किंग ग्रँड ' - हा १५०० किलो (दीड टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक आठ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात मिळतो. यामध्ये दुहेरी कॅबिन मॉडेलही आहे. लांबी साडेसतरा फूट (५३६० मिमी ) आणि व्हील बेस साडेदहा फूट (३२५० मिमी ) आहे.

         शक्तिमान -आखूड बॉनेटचे दोन 'शक्तिमान ' ट्रक ही या मालकेतील चांगली ऑफर आहे. उंच बांधणी आणि निमुळत्या आखूड बॉनेटमुळे चालकाला रस्त्यावरचं  दृश्य व्यवस्थित दिसू शकेल. या ट्रकांना पुढे बॉनेट असलं तरी त्यांची इंजिनं मात्र छोटा हत्ती किंवा आयशरसारखी चालकाच्या बैठकीखाली बसवली आहेत. त्यामुळे कॅबिनमधल्या जागेत अडचण वाटत नाही आणि चालकाच्या पायाला इंजिनच्या उष्णतेचा त्रास होण्याचंही टळतं. या 'मिड इंजिन' पद्धतीमुळे गाडी रिकामी पळताना अधिक स्थिरता मिळते. याशिवाय बॉनेट असूनही जास्त लांबीचा हौदा बसवता येतो. या वाहनांचे रेडिएटर मात्र बॉनेटमध्ये बसवले आहेत, ते इंजिनापासून दूर असल्याने तापमान मर्यादित राखणारी कूलिंग सिस्टीम अधिक कार्यक्षम होते.  रेडिएटर कूलंट, काच स्वच्छ करण्याचं पाणी आणि ब्रेक व पॉवर स्टिअरिंगचं तेल भरण्यासाठी बॉनेटमधून व्यवस्था आहे आणि तिथे इंजिनची गुंतागुंत नसल्याने चालकाचा  गोंधळ होण्याचं कारण नाही.  

       
        या दोन्ही मालट्रकांना प्रत्येकी चारच चाकं दिली आहेत. मात्र त्यांची मापं वेगवेगळी आहेत. दोहोंना पुढे मागे लीफ स्प्रिंग (पाटे ) आणि शॉकबसॉर्बर तसंच पुढे अँटिरोलबार दिले आहेत.  दोहोंकरिता साधं (मेकॅनिकल ) अथवा पॉवर स्टिअरिंग निवडता येतं.

        मध्यम आणि दूरच्या अंतरासाठी वापरण्यास हे दोन्ही ट्रक सोयीस्कर ठरतील. विशेषतः जनरेटर, इंजिनं, लेथ मशीन, छपाई मशीन, वृत्तपत्रीय कागदाच्या मोठ्या गुंडाळ्या यांसारख्या वजनदार पण कमी लांबी रुंदीच्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी ते योग्य वाटतात. अगदी कमी लांबी रुंदीमुळे शहरी गर्दीच्या रहदारीत हाताळायला सोपे आहेत.
              

   'शक्तिमान २०० ' - हा १७५० किलो (पावणेदोन टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक नऊ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात तसेच कॅबिन व पूर्ण उंचीच्या हौद्यासह मिळतो. यामध्ये दुहेरी कॅबिन मॉडेलही आहे. लांबी साडेपंधरा फूट (४७२५ मिमी ) आणि व्हील बेस नऊ फूट (२७७० मिमी ) आहे.
     
        या ट्रकला २१५/७५ आर १५ मापाचे रॅडियल टायर वापरले आहेत. पुढे डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. मागचे ब्रेक 'एलसीआरव्ही' या प्रकारचे आहेत. त्याचे शू जसजसे झिजतील तसतसे आपोआप जुळण्याची व्यवस्था आहे.

       'शक्तिमान ४००' - हा ३५०० किलो (साडेतीन टन ) पेलोड क्षमतेचा ट्रक नऊ फूट लांबीच्या हौद्यासह किंवा नुसती कॅबिन व चासी स्वरूपात तसेच कॅबिन व पूर्ण उंचीच्या हौद्यासह मिळतो. यामध्ये पूर्ण उंचीच्या हौद्याच्या मॉडेलची क्षमता ३५०० किलो तर साध्या हौद्याच्या मॉडेलची क्षमता ३६२० किलो आहे. लांबी सव्वासतरा  फूट (५१७० मिमी ) आणि व्हील बेस सव्वादहा फूट (३१०० मिमी ) आहे.


     या ट्रकला ८.२५ X १६ मापाचे १६ प्लाय टायर वापरले आहेत. पुढे आणि मागे ड्रम ब्रेक आहेत. मागचे ब्रेक 'एलसीआरव्ही' या प्रकारचे आहेत. त्याचे शू जसजसे झिजतील तसतसे आपोआप जुळण्याची व्यवस्था आहे.



करिष्मा मोटारसायकल : रॉयल एन्फिल्ड 

मोटारसायकल चालवणाऱ्या कोणत्याही भारतीयाच्या मनात 'बुलेट'विषयी एक वेगळाच दबदबा असतो. मूळ ब्रिटिश बनावटीच्या 'रॉयल एन्फिल्ड' या मोटारसायकलचा भारतात 'बुलेट ' या नावाने अनेक वर्षं वापर झाला. पण गेली काही वर्षं 'बुलेट'सह रॉयल एन्फिल्डची आणखीही मॉडेलं भारतीय मोटरपेठेत उपलब्ध आहेत.
रॉयल एन्फिल्ड मोटारसायकली ३५०, ५०० आणि ६५० सीसी क्षमतेच्या पेट्रोल इंजिनांसह उपलब्ध आहेत. यांपैकी ६५० सीसीचं इंजिन ट्विन सिलिंडरचं आहे.

१९३२ पासून मोटारसायकलस्वारांच्या मनात अढळ स्थान असलेली 'बुलेट', क्लासिक आणि थंडरबर्ड या तीन गाड्या ३४६ किंवा ४९९ सीसी इंजनसह मिळतात. प्रति मिनिट ७२५० फेऱ्यांत ४७ हॉर्सपावर शक्ती निर्माण करणारं ६४८ सीसी एअर /वॉटर कूल्ड इंजिन इंटरसेप्टर आणि जीटी कॉन्टिनेन्टल कॅफे रेसर गाड्यांसाठी वापरली आहेत. 'बुलेट', क्लासिक आणि थंडरबर्ड या एकेका सायलेन्सरच्या तर इंटरसेप्टर आणि जीटी कॉन्टिनेन्टल या दोन दोन सायलेन्सरच्या गाड्या आहेत. (काँटिनेंटलच्या टेस्ट राईड रिपोर्टसाठी पहा-मोटार जगत मार्च २०१५) याशिवाय हिमालया ही 'क्रॉस कंट्री' प्रकारातली ५०० सीसी मोटारसायकलही रॉयल एन्फिल्डने गेल्या वर्षी मोटारपेठेत उतरवली आहे.

मोठी इंजिनं असलेल्या या मोटारसायकली वेगवेगळ्या उद्देशाने वापरण्यासाठी निवडणं योग्य. नेहमीच्या वापरासाठी तसंच दूरच्या प्रवासासाठी अखंड बैठक असलेल्या बुलेट, थंडरबर्ड  अधिक चांगल्या. हौशी रुबाबदार स्वाराला एकेरी बैठकीची क्लासिक शोभून दिसेल. लष्करी रंगछटांची, काऊबॉय सजावट करता येण्यासारखी दुसरी कुठलीच मोटारसायकल भारतात रॉयल एन्फिल्ड क्लासिकच्या क्षमता आणि किंमत गटात उपलब्ध नाही.

भारतीय बनावटीच्या मोटारसायकलींमध्ये 'कॅफे रेसर' या प्रकारचं मॉडेल सध्या तरी फक्त रॉयल एन्फिल्ड जीटी कॉन्टिनेन्टल हेच आहे. या गाडीला स्लीपर क्लचसह सहा गतीचा गिअरबॉक्स आहे.  दूरच्या प्रवासात बाहू आणि छातीला अधिक सुखकर वाटण्यासाठी थंडरबर्डची निवड सार्थ ठरेल. सुपरबाइक वापरण्याची हौस असेल तर इंटरसेप्टर ही बजटमधली मोटारसायकल आहे. रॉयल एन्फिल्डच्या सर्व मॉडेलमध्ये रंगछटांच्या निवडीला पुष्कळच वाव आहे. प्रत्येक मॉडेलची रंगाची धाटणी (स्टाईल) निरनिराळी आहे आणि मॉडेलनुसार रंगही वेगवेगळे आहेत.

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...