Monday, November 11, 2019

विजेवर चालणाऱ्या दोन चाकी वाहनांची भारतीय मोटरपेठेत चलती

 विजेवर चालणाऱ्या दोन चाकी वाहनांचा झपाट्याने प्रसार होऊ लागलाय.   ‘बजाज चेतक’ पुढील वर्षी मोटारपेठेत येत असली तरी या प्रकारच्या गाड्या तयार करणाऱ्या नव्या   आणि अपरिचित कंपन्यांनी भारतीय मोटारपेठेत बस्तान बसवणं सुरु केलंयपूर्वीच्या जमान्यात बजाज स्कूटरची स्पर्धक असणारी ‘लॅम्ब्रेटा‘ देखील विजेची शक्ती वापरून  भारतीय रस्त्यांवरून पळण्याच्या  तयारीत आहे. 
       नव्या आणि अनोळखी नावांच्या बऱ्याच दोनचाकी उत्पादकांचा भारतातील व्यवसाय तेजीत चालू लागला आहे.  २०१९ साली तुन्वालनावाच्या उत्पादकाने सात प्रकार बाजारात उतरविले आहेत, त्यांमध्ये दिव्यांगांसाठी तीन चाकी वाहनाचंही एक मॉडेल आहे.  स्पोर्ट 63’, ‘स्टॉर्म Zx’, इलेक्ट्रिका 48’, लिथिनो Li’ अशी त्यांची नावं आहेत. आणि व्होल्टेज क्षमतेप्रमाणे त्यांच्यात कमीजास्त शक्तीच्या गाड्या आहेत.
       या गाड्यांमध्ये लेड असिड आणि लिथियम आयन अशा दोन्ही प्रकारच्या बॅटऱ्या वापरल्या आहेत, लिथियम आयन बॅटरी असलेली मॉडेलं अधिक शक्तिशाली आहेत. लेड असिड बॅटरीची दोन  वर्षाची आणि लिथियम आयन बॅटरीची एका वर्षाची वारंटी आहे. मागच्या चाकांच्या बसविलेल्या विद्युत मोटारीमुळे वेग घेणाऱ्या या दुचाक्या विशिष्ट स्विच दाबून 'लो' किंवा 'हाय' गतीमध्ये पळवता येतात. 'लो मोड' शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर तर 'हाय मोड' मोकळ्या रस्त्यावर उपयोगी आहे. या गाड्यांच्या शक्तीप्रमाणे त्या एका चार्जिंगमध्ये ७० ते ८५ किमी अंतर कापतात, त्यांपैकी इलेक्ट्रिका 48  ही  मोपेडसदृश बाईक एका चार्जमध्ये तब्ब्ल १०० किमी जाईल असा उत्पादकांचा दावा आहे. 
        वेगवेगळ्या सहा रंगछटांमध्ये मिळणाऱ्या या गाडयांना पुढे डिस्क ब्रेक, सीटखाली हेल्मेट राहील एवढी जागा, हॅण्डलच्या खालच्या भागात विंडशील्डच्या मागे ग्लोव्ह बॉक्स, अलार्मसह रिमोट चावी आणि मागचं चाक 'लॉक' करण्याची सुविधा पुरविली आहे. महिला, महाविद्यालयीन युवती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही गाडी अतिशय सोयीस्कर आहे, असं रत्नागिरीतील विक्रेत्या 'यशराज मोटर्स'च्या संचालिका सलोनी बने यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Featured Post

 महिंद्रा XUV 700       भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सुमुहूर्तावर 'महिंद्रा XVU 700' या नव्या आलिशान 'एसयूव्ही'...